महत्वाच्या बातम्या

 हिंगणघाट येथे पुन्हा धाडी, ६८४ ब्रास अवैध रेतीसाठा जप्त


-  हिंगणघाट शहर व परिसरात ठिकठिकाणी कारवाई

-  अवैध रेतीवर कारवाईचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

-  साठा आढळल्याने वर्धा नागरी पतसंस्थेला नोटीस

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : अवैधपणे साठवणूक केलेल्या रेतीवर कारवाई करुन साठा जप्त करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांना सर्व तहसिलदारांना दिले आहे. त्याप्रमाणे ठिकठिकाणी अवैध रेतीवर मोठ्या प्रमाणात कारवाई केली जात आहे. हिंगणघाट येथे पुन्हा ठिकठिकाणी धाडी टाकून तब्बल 684 ब्रास इतका रेतीसाठा पुन्हा जप्त करण्यात आला. हिंगणघाट तहलिसदार व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.

हिंगणघाट येथील मोहता मील परिसरातील कारवाईनंतर जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी ठिकठिकाणी अवैध रेतीसाठ्याचा शोध घेऊन कारवाई करण्याचे आदेश दिले आहे. त्याप्रमाणे अवैध रेती साठ्यावर ही कारवाई केली जात आहे. हिंगणघाट येथे पहिल्या कारवाईत 200 ब्रास रेतीसाठा जप्त करण्यात आला होता. हा साठा हिंगणघाट पोलिस स्टेशनच्या परिसरात जमा करण्यात आला आहे.

नव्याने ठिकठिकाणी टाकलेल्या धाडींमध्ये तब्बल 684 ब्रास इतका रेतीसाठा आढळून आला आहे. धाडीची ही कारवाई जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या आदेशान्वये अप्पर जिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले, तहसिलदार सतिश मासाळ, नायब तहसिलदार सागर कांबळे, मंडळ अधिकारी डी.आय. हेमणे, विलास राऊत, संजय नासरे, तलाठी सतिश झारे, रामकृष्ण घवघवे, गजानन ठाकरे, श्रीकांत राऊत, कोमल ढोबळे यांनी केली.

पथकाने केलेल्या कारवाईत डंकीन, कवडघाट या परिसरातून 160 ब्रास रेती जप्त करुन ती हिंगणघाट पोलिस स्टेशनच्या आवारात जमा करण्यात आली. मौजा हडस्ती येथे देखील 230 ब्रास, मौजा धोच्ची येथे 30 ब्रास, मौजा साती येथे 45 ब्रास, शेकापूर मोझरी येथे 20 ब्रास, पेाहणा येथील सुतगिरणी येथे 40 ब्रास, कापसी व नांद्रा येथे प्रत्येकी 12 ब्रास, कवडघाट येथे वर्धा नागरी सहकारी पतसंस्था मर्या हिंगणघाटच्या परिसरात 135 ब्रास अवैध रेतीसाठा जप्त करण्यात आला. अवैध रेतीसाठा प्रकरणी या बँकेस नोटीस बजावण्यात आली आहे.

हा सर्व साठा जप्त करुन तहसिल प्रशासनाने आपल्या ताब्यात घेतला आहे. ही रेती शासनाच्या नवीन धोरणाप्रमाणे घरकुल लाभार्थ्यांना विनामुल्य उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. हिंगणघाट येथे अवैध रेतीसाठ्यावर सलग दुसरी ही मोठी कारवाई करण्यात आली आहे.


अवैध रेतीसाठ्याची माहिती द्या : राहुल कर्डिले

जिल्ह्यात काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अवैध रेतीसाठा आढळून आला आहे. अन्य ठिकाणी देखील असा साठा असण्याची शक्यता आहे. तहसिलदारांना या साठ्यांचा शोध घेऊन त्यावर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहे. नागरिकांना असा साठा आढळून आल्यास त्यांनी 83297 50342 या व्हाट्सॲप क्रमांकावर संदेश पाठवून तक्रार नोंदवावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.






  Print






News - Wardha




Related Photos