सहकारी अधिकारी दहा हजारांची लाच स्वीकारताना एसीबीच्या जाळ्यात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा :
संस्था नोंदणी करण्यासाठी मुख्य प्रवर्तक म्हणून नोंदणी करण्यासाठीचा प्रस्ताव अधिकाऱ्याची सही करून प्रस्ताव सहाय्यक आयुक्तांकडे पाठविण्याच्या कामासाठी दहा हजारांची लाच स्वीकारणारा जिल्हा दुग्धविकास अधिकारी कार्यालय भंडारा येथील सहाय्यक सहकारी अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला आहे.
मंगेश पांडूरंग दोनाडकर (४४) असे लाचखोर अधिकार्याचे नाव आहे. तक्रारदार मासेमारीचा व्यवसाय करतो. ढिवर समाजाच्या लोकांची नवीन एकलव्य मच्छीमार सहकारी संस्था पिंडकेपार, गणेशपूर या नावाने संस्था तयार करून संस्थेची नोंदणी करण्यासाठी मुख्य प्रवर्तक म्हणून नोंदणी करण्याचे काम तक्रारदाराकडे सोपविण्यात आले होते. यामुळे तक्रारदाराने जिल्हा दुग्ध विकास अधिकारी कार्यालयात रितसर अर्ज केला होता. याबाबत वेळोवेळी सदर अर्जाबाबत सहकारी अधिकारी मंगेश दोनाडकर यांची भेट घेत होते. दोनाडकर यांनी अधिकाऱ्याची सही घेवून प्रस्ताव सहाय्यक आयुक्त तांत्रिक, मत्स्य विभाग भंडारा यांच्याकडे पाठविण्यासाठी १५ हजारांची लाच मागितली. याबाबत भंडारा येथील एसीबी पथकाकडे तक्रार दाखल करण्यात आली.
सापळा कारवाईदरम्यान आज २५ फेब्रुवारी रोजी सहकारी अधिकारी मंगेेश दोनाडकर यांनी पहिला हप्ता म्हणून १० हजारांची लाच स्वीकारली. यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक कायदा (सुधारित) अधिनियम २०१८ अन्वये भंडारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
सदर कारवाई पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक राजेश दुद्दलवार यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपअधीक्षक महेश चाटे, पोलिस निरीक्षक योगेश्वर पारधी, पोलिस निरीक्षक प्रतापसिंग भोसले, पोलिस हवालदार संजय कुरंजेकर, पोलिस शिपाई सचिन हलमारे, अश्विनकुमार गोस्वामी, कोमल मनकर,, शेखर देशकर, पराग राउत, कुणाल कडव, सुनिल डुकरे, चालक शिपाई दिनेश धार्मिक यांनी केली आहे.

   Print


News - Bhandara | Posted : 2019-02-25


Related Photos