कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचा पेपर तपासणीवर बहिष्कार कायम , ३० लाख उत्तरपत्रिका पडून


- बारावीचा निकाल लांबणार
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / मुंबई : आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी पेपर तपासणीवर बहिष्कार कायम ठेवला असल्याने बारावीच्या सुमारे ३० लाख उत्तरपत्रिका पडून असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. अर्थ विभागाकडे असलेल्या मागण्यांवर निर्णय होत नाही तोपर्यंत उत्तरपत्रिका तपासणार असल्याची भूमिका कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने घेतल्याने बारावीचा निकाल लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
शिक्षणमंत्र्यांनी शिक्षण विभागांतर्गत असलेल्या मागण्या मान्य केल्या असल्या, तरी अर्थमंत्र्यांनी २६ फेब्रुवारीला बैठक बोलावल्याने आंदोलन लांबले आहे. दररोज सुमारे १५ लाख उत्तरपत्रिकांचे गठ्ठे पडून राहणार आहेत. शिक्षणमंत्र्यांनी घेतलेल्या बैठकीनंतर विद्यार्थी हितासाठी केवळ परीक्षेवर टाकलेला बहिष्कार मागे घेतला होता. उरलेल्या मागण्यांवर अर्थमंत्री जोपर्यंत निर्णय घेत नाहीत, तोपर्यंत उत्तरपत्रिका तपासणार नसल्याचेही महासंघाने स्पष्ट केले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार ५ जूनआधी बारावीचा निकाल लागणे बंधनकारक आहे. मात्र निकालाची डेडलाइन हुकल्यास त्यास सर्वस्वी सरकार जबाबदार असेल, असे महासंघाचे अध्यक्ष प्रा. अनिल देशमुख यांनी म्हटले आहे.
News - Rajy | Posted : 2019-02-25