महत्वाच्या बातम्या

 ईरई नदी पात्रालगत तयार होत आहेत विसर्जन कुंड


- गणपती आणि दुर्गादेवीच्या मोठ्या मुर्तींची विसर्जनाची होणार व्यवस्था
- आयुक्तांनी केली कामाची पाहणी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : आगामी गणेशोत्सव व इतर उत्सवांचा काळ पाहता विसर्जन व्यवस्था सुरळीत होण्याच्या दृष्टीने ईरई नदी पात्रालगत मोठे विसर्जन कुंड तयार केले जात असुन गणपती आणि दुर्गादेवीच्या मोठ्या मुर्तींची विसर्जन व्यवस्था येथे होणार आहे. आयुक्त विपीन पालीवाल यांनी या बांधकामाची पाहणी केली व कंत्राटदारास नियोजीत वेळेत काम पुर्ण करण्याचे निर्देश दिले.  


यंदा सप्टेंबर महिन्यात गणेशोत्सव व त्यानंतर दुर्गादेवी उत्सव आहे. दोन्ही उत्सव शहरात मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. विशेषतः गणेशोत्सव काळात अनेक मंडळांद्वारे मोठ्या मुर्तींची स्थापना केली जाते. मूर्ती मोठी असल्याने जिथे पाणी अधिक प्रमाणात उपलब्ध असेल तिथे विसर्जन करण्याकडे कल असतो.
याआधी रामाळा तलावात मोठया प्रमाणात मूर्तींचे विसर्जन केले जायचे मात्र मागील वर्षी तलाव प्रदूषणमुक्त करण्याच्या दृष्टीने श्रीगणेश व दुर्गादेवी मूर्ती विसर्जन रामाळा तलावात न करता विसर्जनाची व्यवस्था ईरई नदी पात्रालगत करण्याचे निर्देश प्रशासनातर्फे देण्यात आले होते.


त्यानुसार शहरातील सर्व मोठ्या मूर्तींचे विसर्जन हे ईरई नदीत करण्यात आले होते. विसर्जन स्थळी येथे मोठ्या प्रमाणात गर्दी वाढली होती, परंतु नदीतील पाणी नैसर्गिकरीत्या कमी झाल्याने विसर्जनास अडथळा निर्माण झाला होता. नदीवर बंधारा बांधुन त्याद्वारे पाणी अडविण्याचाही प्रयत्न करण्यात आला होता, परंतु त्यास यश प्राप्त झाले नव्हते. यावर उपाययोजना म्हणुन विसर्जन स्थळी मोठ्या मूर्तींसाठीही  विसर्जन कुंड असावे यादृष्टीने मनपाने प्रयत्न सुरु केले.


महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियान अभियान अंतर्गत निधी उपलब्ध होताच दाताळा रोडवरील रामसेतु पुलालगतच्या जागेत विसर्जन स्थळी मोठे विसर्जन कुंड तयार करण्यास सुरवात करण्यात आली आहे. या विसर्जन कुंडांद्वारे अधिकाधिक मोठ्या मूर्तींचे विसर्जन हे कुंडात करण्यात येणार आहे. नदीतील विसर्जन बंद झाल्याने मोठ्या मूर्तींच्या विसर्जनास अडथळा निर्माण होणार नसुन नदी प्रदूषणासही चाप बसणार आहे. 





  Print






News - Chandrapur




Related Photos