महत्वाच्या बातम्या

 सेंद्रिय कंपनी कडून शेतकऱ्यांची फसवणूक : सिंदेवाही तालुक्यातील रत्नापूर येथील प्रकार


- कंपनी डायरेक्टरला शेतकऱ्यांचा घेराव : अखेर पोलीस विभागाला पाचारण

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / सिंदेवाही : बि.एम.सी. सोशल वेलफेअर सोसायटी नागपूर यांनी सेंद्रिय शेती करण्यासाठी शेतकरी गट तयार केले. यासाठी विविध प्रलोभन दाखविण्यात आले. मात्र या प्रलोभनातील एकही लाभ शेतकऱ्यांना मिळाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना शंका आल्याने रत्नापूर येथील कार्यशाळेत कंपनी डायरेक्टर व शेतकरी यांच्यात हंगामा झाला. शेवटी पोलीसांना पाचारण करण्यात आले व घेतलेले पैसे परत करण्याचा समझोता केल्याने प्रकरण शांत झाले. 

बि.एम.सी. सोशल वेलफेअर सोसायटी नागपूर ही कंपनी २००४ पासून रजीस्टर असुन विदर्भात शेती क्षेत्रात कार्यरत आहे. कंपनीचा विस्तार म्हणून सिंदेवाही तालुक्यात २०२३ पासून सुरू आहे. या माध्यमातून सात ते आठ लोकांना  कृषी सहायक म्हणून प्रशिक्षीत करण्यात आले असुन त्यांच्या कडुन प्रशिक्षण शुल्कापोटी प्रत्येकी ३ हजार रुपये घेण्यात आले. याच स्थानीक कृषी सहायक (एजंट) लोकांना घेऊन १३३ कृषी गट गठीत करण्यात आले. एका गटात १५ ही संख्या निश्चीत करण्यात येऊन एका गटाला प्रती व्यक्ती ३०० रुपये प्रमाणे ४ हजार ५०० रूपये असे १३३ गटांचे ५ लाख ९८ हजार ५०० रुपये या एजंटांच्या माध्यमातून कंपनीकडे आतापर्यंत जमा करण्यात आले.

या माध्यमातून शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती प्रकल्पा अंतर्गत प्रशिक्षण, विमा, ७५ हजार रुपये अनुदान व इतर लाभ देण्यात येणार होते. यामुळे तालुक्यातील बहुतेक शेतकरी या कंपनीसोबत जुळले. शेतकरी गट यांचे करार करण्यात आले. आता प्रत्यक्ष शेतीच्या हंगामाला सुरुवात होत असल्याने पुन्हा कंपनीकडुन  कार्यशाळा सुरू झाल्या यामधुन तुम्हाला सेंद्रिय शेतीसाठी निवीष्ठा (खत) पुरवठ्यासाठी पुन्हा १ हजार ५०० ते ३ हजार रुपये जमा करण्यास सांगण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये शंका निर्माण झाली आणि रविवारला जिल्हा परिषद शाळा रत्नापूर येथील झालेल्या कार्यशाळेत कंपनी चे प्रमुख भीमराव एकनाथ मेश्राम यांनी समाधानकारक उत्तरे न दिल्याने शेवटी वाद निर्माण झाला. पोलीस विभागाला पाचारण करण्यात आले. त्यामुळे अनुचीत प्रकार टळला. जोपर्यंत पैसे परत करीत नाही तोपर्यंत त्यांची चारचाकी गाडी रत्नापूर येथे ठेवण्यात आली आहे. 

सेंद्रिय शेती करण्यासाठी आम्ही गट तयार केले. गट तयार करण्यासाठी आमच्या कडून पैसे घेतले आणि पुन्हा सेंद्रिय खत घेण्यासाठी पुन्हा ३ हजार रुपये मागितले त्यामुळे हि कंपनी बोगस आहे. हे आमच्या मनात शंका निर्माण झाली.त्यामुळे शेतकयांचे पैसे कंपनीने परत करावे. - गावातील एक शेतकरी

आमची कंपनी २००४ पासून कार्यरत असुन विदर्भात काम करीत आहे. कोणत्याही शेतकऱ्यांची फसवणुक केली नाही. ज्यांना पटत नसेल त्यांनी तसा कंपनी कडे अर्ज करावा त्यांचे पैसे परत करण्यात येतील. - भीमराव एकनाथ मेश्राम कंपनी डायरेक्टर बि.एम.सी. वेलफेयर सोसायटी नागपूर





  Print






News - Chandrapur




Related Photos