सरकार स्वार्थासाठी संविधानाच्या विरोधात जाणार नाही : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर
:  अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी आमच्या कार्यकाळात झाली नाही. आणीबाणीच्या काळात झाली होती. त्यावेळी बलाढ्य शक्तीला देशवासीयांनी उलथवून टाकले. आज देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्याची फारशी काळजी करण्याची गरज नाही. सरकार स्वार्थासाठी संविधानाच्या विरोधात जाणार नाही. नक्षली साहित्य वाचले म्हणून अटक होणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ९९ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या व्यासपीठावरून दिले.
 प्रेमानंद गज्वी यांनी शहरी नक्षलवादावरून सरकारला लक्ष्य केले होते. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर सतत चर्चा होत राहिली पाहिजे. निरोगी समाजासाठी हे गरजेचे आहे. सहिष्णुता या देशाच्या रक्तात आहे. ती कुणीही घालवू शकत नाही. या देशावर अनेक आक्रमणे झालीत. ती आपण पचवली. आपण बहिष्कृत, परिष्कृतांनाही सामावून घेतले. तेव्हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याची काळजी करण्याची गरज नाही. 'मी शहरात राहतो नि माझ्याजवळ नक्षली विचारांचे साधे पत्रक सापडले तरी मला केव्हाही शहरी नक्षलवादी ठरवला जाईल', असे गज्वी म्हणाले होते. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले, नक्षली साहित्य सापडले म्हणून अटक करण्याचे कारण नाही. मीदेखील असे साहित्य वाचले आहे. त्यामुळे अशी अटक करायची झाली तर मलाच करावी लागेल. मात्र ज्या ठिकाणी देशविरोधी कृत्याचे पुरावे मिळतील तिथे कारवाई करणे राष्ट्रीय कर्तव्य आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.    Print


News - Nagpur | Posted : 2019-02-24


Related Photos