महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाचा संचालक अडकला एसीबीच्या जाळ्यात


- धान खरेदी केंद्राचे अधिकार कायम ठेवण्यासाठी मागितली लाच
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
धान खरेदी केंद्राचे अधिकार कायम ठेवण्यासाठी चांगला अहवाल शासनाकडे सादर करण्याच्या कामासाठी ३० हजारांच्या लाचेची मागणी करून २५ हजारांची लाच स्वीकारल्याप्रकरणी चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याकरीता कार्यरत असलेला महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्या. नाशिक चा संचालक प्रकाश तुळशिराम दडमल (५०) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला आहे.
ही कारवाई गडचिरोली येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केली आहे. तक्रारदाराच्या संस्थेला धान खरेदी केंद्राचा अधिकार मिळवून दिला. तसेच पुढील काळाता धान खरेदी केंद्र सुरू ठेवण्यासाठी चांगला अहवाल सादर करण्याच्या कामाकरीता ३० हजारांची लाच मागितली. याबाबत गडचिरोली एसीबीकडे तक्रार प्राप्त होताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने काल २२ फेब्रुवारी रोजी सापळा रचला. तडजोडीअंती २५ हजारांची लाच स्वीकारताना प्रकाश दडमल याला अटक करण्यात आली. याबाबत आरमोरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूरचे पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक राजेश दुद्दलवार, पोलिस उपअधीक्षक विजय माहुलकर, पोलिस उपअधीक्षक डी.एम. घुगे यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक रवी राजुलवार, सहाय्यक फौजदार मोरेश्वर लाकडे, पोलिस हवालदार प्रमोद ढोरे, नापोशि सतिश कत्तीवार, सुधाकर दंडीकेवार, देवेंद्र लोनबले, पोलिस शिपाई महेश कुकडकार, गणेश वासेकर, किशोर ठाकूर, महिला पोलिस शिपाई सोनल आत्राम, सोनी तावाडे, चालक शिपाई तुळशिराम नवघरे यांनी केली आहे.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-02-23


Related Photos