महत्वाच्या बातम्या

 डोंगरीच्या बालगृहात भिंतीपलीकडून ड्रग्ज : मोबाइलवरून दिली जात होती ऑर्डर


- दोन जणांना अटक 


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई : बालसुधारगृह म्हणजे वाट चुकलेल्या, भरकटलेल्या मुलांना आयुष्याची गाडी पुन्हा रुळावर आणण्यासाठी मिळालेली संधी.
मात्र, डोंगरी बालसुधारगृहात नेमके उलटे चित्र आढळून आले आहे. या ठिकाणी चक्क सुधारगृहाच्या भिंतीपलीकडून राजरोस ड्रग्ज पोहोचत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. या प्रकरणी डोंगरी पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे.


कल्याणचे रहिवासी असलेले पोलिस शिपाई आकाश शिंदे वय २८ यांनी ९ जून रोजी सकाळी डोंगरी बाल निरीक्षक गृह येथे गार्ड म्हणून कर्तव्यावर असताना निरीक्षण गृहाचे अधीक्षक कंठीकर यांच्या सूचनेवरून त्यांनी तेथील बालकांची पथकाच्या मदतीने झाडाझडती सुरू केली. पावणेपाचच्या सुमारास जुन्या इमारतीतील तिसऱ्या मजल्यावर असलेल्या साहिल बाबू पाटोळे (१८ वर्ष ७ दिवस) आणि शरीफ अकबर शेख (१८ वर्ष ११ महिने १५ दिवस) हे दोघेही झडतीला विरोध करू लागले. शिंदे यांना संशय आला. त्यांनी दोघांची झडती घेतली असता त्यांच्या खिशात दोन प्लास्टिकच्या पुड्यांमध्ये गांजा सापडला. तसेच मोबाइल आणि ब्लेडचा तुकडाही आढळला. शिंदे आणि पथकाने मुद्देमाल जप्त करत डोंगरी पोलिसांच्या ताब्यात दिला. पाटोळे हा हत्येच्या गुन्ह्यात गेल्या दोन ते तीन वर्षांपासून येथे कैद आहे.


अधीक्षकासह पथकावर हल्ला :
मुलांकडून गांजा जप्त करत शिंदे अधीक्षकांसोबत गेटजवळ आले. तिथे पाटोळे याने त्यांना शिवीगाळ करत धमकावण्यास सुरुवात केली. त्यांनी दुर्लक्ष करताच, पाटोळेचा मित्र शरीफ अकबर शेख तसेच १७ वर्षांचा मुलगा तेथे आला.
तिघांनी अधीक्षकांसह पथकाला शिवीगाळ करत मारहाण करण्याचा प्रयत्न केला. अखेर, त्यांनी पोलिस नियंत्रण कक्षात कॉल करून मदत घेतली.
डोंगरी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी शरीफ आणि साहिलला ताब्यात दिल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.


काय काय सापडले?
१५ ग्रॅम गांजा तसेच, चिनीमातीची गांजा ओढण्याची चिलीम, सफेद रंगाचे कापड, मोबाईल आणि ब्लेड.


फोन करून ऑर्डर...
मोबाइलवरून ते ड्रग्ज मागवत असल्याची माहिती आहे. यापूर्वीही अशाच प्रकारे आलेला गांजा अन्य अंमलदाराने जप्त केल्याचे कारागृहातील कर्मचाऱ्याने सांगितले.





  Print






News - Rajy




Related Photos