मुरखळा येथे १० दारूविक्रेत्यांना गाव संघटनेची नोटीस


-  रॅली काढून जनजागृती  : पोलीस तक्रारीसाठी महिला आक्रमक
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी /  गडचिरोली :
तालुक्यातील मुरखळा येथे मुक्तिपथ गाव संघटनेच्या महिलांनी रॅली काढून दारूबंदीबाबत जनजागृती करतानाच १० विक्रेत्यांना दारूविक्री तत्काळ थांबविण्याबाबत निवेदन दिले. दारूविक्री करताना कुणी आढळल्यास ५ हजार रुपये दंड तसेच पोलीस तक्रार करण्याचा निर्णयही महिलांनी घेतला.
मुरखळा गावात अनेक महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात दारूविक्री होत आहे. याचा विपरित परिणाम गावाच्या सामाजिक आणि आर्थिक विकासावर होत आहे. युवकही दारूच्या आहारी जात आहे. या पूर्वी गाव संघटनेने दारूविक्री बंदीसाठी प्रयत्न केले. पण विक्री सुरूच राहिली. काहीच दिवसांपूर्वी गावात मुक्तिपथ गाव संघटनेचे पुनर्गठन करून महिलांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. दारूमुळे होत असलेला त्रास थाबंण्यासाठी संघटनेच्या महिलांनी रात्री गावात रॅली काढून जनजागृती करतानाच थेट गावातील १० दारूविक्रेत्यांना विक्री बंद करण्याची नोटीस दिली. सोबतच विकताना आढळल्यास ५ हजार रुपये दंड वसूल केला नजर असल्याचेही सांगण्यात आले. विक्रेत्यांवर अंकुश आणण्यासाठी नियमित अहिंसक कृती करण्याचा निर्णयही महिलांनी घेतला.

विक्री न थांबविल्यास पोलीस तक्रार

दारूविक्रीबंदीची नोटीस आणि दंडाची तरतूद करतानाच पोलीस तक्रार करण्याचा निर्णयही महिलांनी घेतला. लपून छपून दारूची विक्री करणारे अनेक जण गावात आहेत. अशा विक्रेत्यांवर वचक आणण्यासाठी सातत्याने अहिंसक कृती करून त्यांच्याविरुद्ध पोलीस तक्रार केली जाणार आहे. तसेच कठोर कारवाई करण्याची मागणीही महिला करणार आहे.   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-02-22


Related Photos