सुवासिक प्रेमकहाणीचा थरारक 'परफ्युम'


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
मनोरंजन प्रतिनिधी / मुंबई : 
मनाला मोहून घेणाऱया परफ्युममुळे कॉलेजवयीन नायक-नायिका एकत्र येतात आणि त्यांच्या प्रेमकहाणीला कसं थरारक वळण लागतं याचं चित्रण परफ्युम या चित्रपटाद्वारे पहायला मिळणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आला असून, गुंतवून ठेवणारी कथा, लक्षवेधी अभिनय, श्रवणीय संगीत आणि नेत्रसुखद छायांकन ही या चित्रपटाची शक्तीस्थळं असल्याचं ट्रेलरवरून लक्षात येतं.
'हलाल'सारख्या गाजलेल्या चित्रपटाची निर्मिती केलेल्या, तसेच आगामी 'लेथ जोशी' चित्रपटाची प्रस्तुती करणाऱ्या अमोल कागणे फिल्म्सच्या अमोल कागणे आणि लक्ष्मण कागणे यांनी 'परफ्युम' हा चित्रपट प्रस्तुत केला आहे. तर एचआर फिल्मडॉमच्या डॉ. हेमंत दीक्षित आणि ओंकार दीक्षित यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर करण तांदळे यांनी चित्रपटानं दिग्दर्शक आणि छायांकन केलं आहे. ओंकार आणि मोनालिसा यांच्यासह चित्रपटात सयाजी शिंदे, चिन्मय मांडलेकर, कमलेश सावंत, अभिजित चव्हाण, अनिल नगरकर, भाग्यश्री न्हालवे, हिना पांचाळ यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. किशोर गिऱ्हे यांची कथा असून, पॉल शर्मा यांनी संकलन केलं आहे. प्रोडक्शन हेड म्हणून स्वप्नील दीक्षितने काम पाहिले आहे. 
आजवर प्रेक्षकांनी असंख्य प्रेमपट पाहिले असले, तरी परफ्युम हा चित्रपट नक्कीच वेगळा आहे. कॉलेजमध्ये सुगंधित परफ्युमपासून सुरू झालं कथानक वेगवान आणि थरारक वळणं घेत पुढे सरकतं आणि त्या प्रेमीयुगुलाचं काय होतं, त्यांचं प्रेम यशस्वी ठरतं का असे अनेक प्रश्न हा ट्रेलर उपस्थित करतो. म्हणूनच या चित्रपटाविषयी आता उत्कंठा निर्माण झाली आहे. मात्र, या चित्रपटासाठी प्रेक्षकांना आता फार काळ वाट पहावी लागणार नाही. कारण १ मार्चला महाराष्ट्रात सर्वत्र परफ्युम हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.  Print


News - Rajy | Posted : 2019-02-21


Related Photos