महत्वाच्या बातम्या

 शेतकऱ्यांनी फळपिक विमा योजनेचा लाभ घ्यावा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : प्रधानमंत्री फसल बिमा योजनेंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारित फळपिक विमा योजना (मृग बहार) जिल्ह्यासाठी लागू करण्यात आली आहे. जिल्ह्यातील आर्वी, आष्टी, कारंजा तालुक्यातील शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी प्रभाकर शिवणकर यांनी केले आहे.

सदर योजना कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना अधिसुचित क्षेत्रातील अधिसुचित पिकांसाठी ऐच्छिक आहे. तसेच अधिसुचित क्षेत्रातील अधिसुचित फळासाठी खातेदारांच्या व्यतिरिक्त कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी या योजनेत सहभागी होण्यास पात्र आहे. 

शेतकऱ्यांना संरक्षित रक्कमेच्या ५ टक्के विमा हप्ता भरावयाचा आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांना योजनेचा लाभ घेता यावा यासाठी जमीन भुधारणेच्या मर्यादेत एका शेतकऱ्यास अधिसूचित फळपिकासाठी ४ हेक्टर क्षेत्र मर्यादेपर्यंत विमा नोंदणीची मुभा देण्यात आली आहे. केवळ उत्पादनक्षेत्र फळबागांनाच विमा संरक्षणाचे कवच लागू असून अधिसूचित फळपिकांपैकी एका फळपिकासाठी एका वर्षात एकाच हंगामाकरीता  विमा संरक्षणासाठी अर्ज करता येईल. सदर योजनेसाठी जिल्ह्यात एचडीएफसी ॲग्रो जनरल इंन्शूरन्स कंपनीची निवड करण्यात आली आहे.

संत्रा व मोसंबी फळपिकासाठी उत्पादनक्षम वय ३ वर्ष असून लिंबू पिकासाठी ४ वर्ष आहे. या योजनेचा मुख्‍य उद्देश नैसर्गिक आपत्ती व हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे फळपिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण आणि आर्थिक सहाय्य देणे आहे. यासाठी  जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील आष्टी, साहुर, तळेगाव, अंतोरा. कारंजा तालुक्यातील कारंजा, सारवाडी, कन्नमवारग्राम व ठाणेगाव या महसूल मंडळातील शेतकऱ्यांनी मोसंबी पिकासाठी, आर्वी तालुक्यातील आर्वी, रोहणा, खरांगणा व वाढोणा, आष्टी तालुक्यातील आष्टी, तळेगाव, साहूर व अंतोरा तसेच कारंजा तालुक्यातील कारंजा, ठाणेगाव, सारवाडी व कन्नमवारग्राम या महसूल मंडळातील शेतकऱ्यांनी संत्रा पिकासाठी व आर्वी तालुक्यातील आर्वी, वाठोडा, खरांगणा व आष्टी तालुक्यातील आष्टी, साहूर, तळेगाव व कारंजा तालुक्यातील ठाणेगाव, कन्नमवारग्राम, सारवाडी या महसुल मंडळातील शेतकऱ्यांनी लिंबू फळपिक विमा योजनेत सहभागी व्हावे.

मोसंबी व संत्रा फळपिकासाठी विमा संरक्षित रक्कम ८० हजार रुपये असून विमा हप्ता ४ हजार रुपये तर लिंबू फळपिकासाठी विमा संरक्षित रक्कम ७० हजार रुपये आहे तर विमा हप्ता ३ हजार ५०० रुपये आहे. शेतकऱ्यांना विमा हप्ता रक्कम बँक खात्यात जमा करावी लागेल. मोसंबी पिकासाठी विमा हप्ता भरण्यासाठी ३० जुन आणि संत्रा व लिंबु फळपिक विमा भरण्यासाठी १४ जुन पर्यंत शेतकऱ्यांनी विमा हप्ता बँक खात्यात जमा करावा, असे  कृषि विभागाने कळविले आहे.





  Print






News - Wardha




Related Photos