गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यात सामुहिक वनहक्क संवर्धनासाठी ४ स्वयंसेवी संस्थांसोबत त्रिपक्षीय सामंजस्य करार : नंदिनी आवळे


-  सामुहिक वनहक्कांचे संवर्धन व व्यवस्थापनासाठी १ कोटी ३३ लाख ४५ हजार ७९४ रुपयांचा निधी मंजूर
-  गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील ७५ गावांचा समावेश
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर :
  सामुहिक वनहक्कांचे संवर्धन व व्यवस्थापनासाठी गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील ४ स्वयंसेवी संस्थांसोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे. या सामंजस्य करारांतर्गत ७५ गावांमध्ये सामुहिक वनहक्क संवर्धन व व्यवस्थापन पद्धत राबविण्यात येणार आहे. या सामंजस्य करारासाठी ७५ ग्रामसभांसाठी १ कोटी ३३ लाख ४५ हजार ७९४ रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या संचालक  नंदिनी आवळे यांनी दिली.
गडचिरोली येथे सामुहिक वनहक्क संवर्धन व व्यवस्थापन यासंदर्भात ४ स्वयंसेवी संस्थांसोबत सामंजस्य करार करण्यात आला. यावेळी  आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या संचालक  नंदिनी आवळे तसेच संबंधित स्वयंसेवी संस्थेचे प्रमुख उपस्थित होते. 
यावेळी ग्रामसभेच्या वतीने प्राधिकृत केलेले प्रतिनिधी तसेच स्वयंसेवी संस्थेच्या वतीने प्राधिकृत केलेले प्रतिनिधी आणि आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था यांच्यावतीने त्रिपक्षीय सामंजस्य करारनाम्यावर स्वाक्षरी करण्यात आली.
अनुसूचित  जमाती व इतर पारंपारिक वननिवासी (वनहक्कांची मान्यता) अधिनियम, २००६ आणि नियम २००८ तसेच सुधारित नियम २०१२ च्या अंमलबजावणी अंतर्गत वैयक्तिक व सामुहिक वनहक्क किंवा दोहोंचे धारणाधिकार मिळण्याचे अधिकार प्राप्त झाले आहे. सामुहिक वनसंपत्तीचे व्यवस्थापन करण्यासाठी ग्रामसभेचे बळकटीकरण आवश्यक आहे. वनांवर उपजीविका साधन उपलब्ध करुन देणे तसेच वनांचे आणि नैसर्गिक साधन संपत्तीचे संवर्धन, संरक्षण, पुननिर्माण करण्याकरिता संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम केंद्रीय जनजाती कार्य मंत्रालय हा पथदर्शी प्रकल्प राबवित आहे.
स्वयंसेवी संस्थेच्या साहाय्याने सामुहिक वनहक्क संवर्धन व व्यवस्थापन आराखडे तयार करण्यासाठी गडचिरोली तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील ७५ ग्रामसभांसाठी १  कोटी ३३ लाख ४५ हजार ७९४ रुपयांचा निधी या प्रकल्पासाठी मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये गडचिरोली येथील ‘वृक्षमित्र’ स्वयंसेवी संस्थेला ३९ गावांसाठी ६९ लाख ३४ हजार ८५१ रुपये तर कुरखेडा येथील ‘आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ या संस्थेला ९ गावांसाठी  १६ लाख २  हजार २१६ रुपये तसेच एरंडी येथील ‘सृष्टी’ संस्थेला २४ गावांसाठी ४२ लाख ६९ हजार ५७३ रुपये प्रकल्प निधीला मान्यता देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे चंद्रपूर येथील विरुर तालूका राजूरा येथील ‘पर्यावरण मित्र’ या स्वयंसेवी संस्थेला ३ गावांसाठी ५ लाख ३९ हजार १५४ रुपयांचा प्रकल्प निधी मान्य करण्यात आला आहे, अशी माहिती आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या संचालक श्रीमती नंदिनी आवळे यांनी दिली.
अमरावती जिल्ह्यातून अचलपूर येथील ‘खोज’ या स्वयंसेवी संस्थेला तसेच यवतमाळ येथील ‘ग्रामीण समस्या मुक्ती ट्रस्ट’ आणि पांढरकवडा तालूका, केळापूर येथील ‘नवी उमेद’ या स्वयंसेवी संस्थांसोबत सामुहिक वनहक्क संवर्धन त्रिपक्षीय सामंजस्य करार करण्यात आला. यावेळी त्रिपक्षीय सामंजस्य करारनामा करण्यासाठी ७५ ग्रामसंभांचे प्राधिकृत प्रतिनिधी, स्वयंसेवी संस्थेचे अधिकारी, प्रतिनिधी उपस्थित होते.  Print


News - Nagpur | Posted : 2019-02-19


Related Photos