महत्वाच्या बातम्या

 तृणधान्याच्या १ लाख १० हजार किटचे होणार मोफत वाटप


-  तृणधान्याचे क्षेत्र व उत्पन्न वाढविण्यावर भर
- शेतकऱ्यांना कृषि कार्यालयातून मिळणार किट


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त तृणधान्याचे क्षेत्र व उत्पादनात वाढ करण्यासाठी जिल्ह्यात या धान्याच्या 1 लाख 11 हजार मिनीकिटचे वाटप करण्यात येणार आहे. या किटचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कृषि विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.
संयुक्त राष्ट्रसंघाने घोषित केल्याप्रमाणे 2023 हे वर्ष राज्यात आंतररराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 म्हणून साजरे केले जात आहे. त्यानुषंगाने जनतेमध्ये या धान्याची जाणीव जागृती करण्यात येत आहे. लोकांना मुबलक प्रमाणात व कमी किंमतीत तृणधान्य उपलब्ध व्हावे यासाठी तृणधान्याच्या क्षेत्रात व उत्पादनामध्ये वाढ करण्यत येणार आहे. त्याचाच भाग म्हणून जिल्ह्यात 1 लाख 7 हजार 160 मिनिकीट आणि क्रॉप कॅफेटेरीया अंतर्गत 3 हजार 78 मिनिकीट मोफत वाटप करण्यात येणार आहेत.
या वाटपामध्ये शेत तिथे पौष्टिक तृणधान्य मोहिमेंतर्गत खरीप ज्वारीचे 31 हजार 750 किट, बाजरी 39 हजार 690, राळा 1 हजार 587, कोदो 7 हजार 940 व राजगिराच्या 11 हजार 910 किट असे एकूण 1 लाख 7 हजार 160 बियाणे मिनिकीट आणि क्रॉप कॅफेटेरीया मध्ये ज्वारी 100 ग्रॅम, बाजरी 50 ग्रॅम, नाचणी 50 ग्रॅम, राळा 100 ग्रॅम, कोदो 50 ग्रॅम व राजगिरा 25 ग्रॅम असे एकूण 375 ग्रॅम वजनाचे 5 आर क्षेत्रासाठी 3 हजार 78 बियाणे मिनिकीट पाकिटे असे दोन्ही मिळून 1 लाख 10 हजार 238 किट मोफत वाटप करण्यात येणार आहे. यातून उत्पादित धान्य शेतकऱ्यांच्या कुटुंबाला वापरता येणार आहे.याशिवाय यातून बियाणे तयार करून पुढील वर्षी शेतकऱ्याना त्याचा वापर करता येणार आहे.यामुळे तृनधान्याचे बियाणे घरीच तयार करता येणार आहे.
बदलत्या जीवनशैलीमुळे हृदयरोग, मधुमेह व पोटाच्या विकाराचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे आहारामध्ये ज्वारी, बाजरी, नाचणी, भगर व राजगिरा अशा तृणधान्यापासून बनलेल्या पदार्थाचे महत्व सुध्दा वाढू लागले आहे. सद्या ज्वारी, बाजरी, नाचणी व भगर या पिकांचे क्षेत्र कमी झाले आहे. त्यामुळे आहारामध्ये सुध्दा ही तृणधान्ये कमी झाली आहे. गव्हाचा वापर वाढल्यामुळे गव्हापासून तयार होणारा मैदा व मैदापासून तयार होणारे ब्रेड, बिस्कीट, कुकीज व केक यांचा वापर वाढलेला आहे. या पदार्थापासून पोटात तयार होणारा चिकटा रक्तवाहीण्यामध्ये साठून त्यामुळे पोटाचे विकार, हृदयाचे विकार व मधुमेहाचे प्रमाण वाढले आहे.
या बदलत्या जीवनशैलीमध्ये पुन्हा ज्वारी, बाजरी, नाचणी व भगर ही तृणधान्ये समाविष्ठ होणे आवश्यक झाले आहे. आता तर डॉक्टर सुध्दा रुग्णांना तृणधाण्याचा आहारात वापर करण्याविषयी शिफारस करीत आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या तृणधान्य पिकाच्या बियाणे मिनीकीटची लागवड करावी. बियाणे मिनीकीट मिळविण्यासाठी शेतकऱ्यांनी त्यांच्या भागातील कृषि सहाय्यक, कृषि पर्यवेक्षक, मंडळ कृषि अधिकारी व तालुका कृषि अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी प्रभाकर शिवणकर यांनी केले आहे.





  Print






News - Wardha




Related Photos