महत्वाच्या बातम्या

 घनकचरा व्यवस्थापन करण्यात नागरिकांनी सहकार्य करावे : जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर 


- ओला व सुका कचरा वर्गीकरण गरजेचे


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : वाढत्या शहरीकरणामुळे घनकचरा व्यवस्थापन हे एक आव्हान झाले आहे. माझी वसुंधरा अंतर्गत नुकताच पवनी नगर परिषदेला विभागस्तरीय प्रथम क्रमांक मिळाला असला तरी नागरिकांनी ओला व सुका कचरा वेगळा करूनच घंटा गाड्यांना द्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी दिले.


पवनी नगर परिषदेच्या कामाचा आढावा घेताना ते बोलत होते. यावेळी मुख्याधिकारी डॉ. विवेक मेश्राम उपस्थित होते. जिल्हाधिकारी यांनी सर्व विभाग प्रमुख यांच्या समवेत स्वच्छ भारत अभियान, माझी वसुंधरा अभियान, वाढीव पाणी पुरवठा योजना, Day-NULM, शहरात सुरु असलेली विविध विकास कामे, अमृत २.० अंतर्गत सुरु असलेली कामे, आस्थापना विषयक बाबी, कर पुनर्मुल्यांकन, प्रधानमंत्री आवास योजना इत्यादी बाबत आढावा घेतला. आढावा घेतांना प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत बांधण्यात आलेल्या घरकुलांचे Rain Water Harvesting करणे अनिवार्य करण्याची सुचना दिली.


कचरा संकलनाचे वेळी जागेवरच विलगीकृत कचरा संकलन करणे संबंधाने नागरिकांना प्रोत्साहित करणे, कर पुनर्मुल्यांकनाचे काम लवकरात लवकर पूर्ण करून ते लागू करण्यात यावे. तसेच शाळेतील वर्ग 5 व 8 च्या 100 टक्के विद्यार्थांना स्कॉलरशिपच्या परीक्षेत सहभागी करून घ्यावे. तसेच जवाहर नवोदयच्या परीक्षेकरिता प्रेरित करावे. यासाठी विद्यार्थ्यांचे आगाऊ शिकवणी वर्ग घ्यावे व पालकांच्या पालकसभा घेऊन त्यांना याबाबत माहिती द्यावी. वर्ग 10 वी मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रत्येक दिवशी शाळा स्तरावर विविध क्षेत्रातील तज्ञांकडून मार्गदर्शन देण्यात यावे, अशा सुचना देऊन नगर परिषदेला विविध स्पर्धेमध्ये प्राप्त झालेले बक्षिसे व सन्मान याबद्दल नगर परिषदेचे अभिनंदन केले.


आढावा बैठक संपल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी घोडेघाट वार्ड येथील बगीचाची व हरितपट्टा विकास कामाची पाहणी केली. तद्नंतर महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियान अंतर्गत पवनी शहर वाढीव पाणी पुरवठा योजने अंतर्गत नव्याने तयार केलेल्या जलशुद्धीकरण केंद्राला भेट देऊन तेथील कामाची पाहणी केली. त्यानंतर न.प. घनकचरा व्यवस्थापन केंद्राला भेट देऊन घनकचरा व्यवस्थापन केंद्रावरील घनकचरा विलगीकरण, कम्पोस्टिंग बेड, पिट कम्पोस्टिंग, सेंद्रिय खत निर्मिती, MRF सेंटर, FSTP व घनकचरा व्यवस्थापन केंद्र परिसरात कचरा संकलनाच्या जुन्या ठिकाणावर प्रस्तावित केलेल्या बगीचाच्या ठिकाणाची पाहणी केली व तेथील कामासंबंधाने आवश्यक ते निर्देश मुख्याधिकारी तसेच स्वच्छता अभियंता यांना दिले. याप्रसंगी उप विभागीय अधिकारी, पवनी व तहसिलदार, पवनी व मुख्याधिकारी तसेच न.प. चे अधिकारी/ कर्मचारी हे उपस्थित होते.





  Print






News - Bhandara




Related Photos