महत्वाच्या बातम्या

 महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना 


 - ९९६ उपचार विनामुल्य
-  औषधे, तपासण्या, उपचार, शस्त्रक्रिया मोफत
-  प्रत्येक कुटुंबाला दिड लाखाचे सुरक्षा कवच
- प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेतून 5 लाखाचा विमा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : आजारांवर फार मोठ्या प्रमाणावर खर्च होतो. हा खर्च सर्वसामान्य रुग्णांच्या आवाक्याबाहेरचा असतो. बरेचदा उपचार किंवा शस्त्रक्रियेसाठी पैसाची जुळवाजुळव होत नसल्याने आजार अंगावर काढले जातात. महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेने अशा हजारो गरीब रुग्णांना फार मोठा आधार दिला आहे. या योजनेतून 996 प्रकारचे उपचार केले जातात. हे संपुर्ण उपचार विनामुल्य केले जाते.
महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना ही महाराष्ट्र शासनाची महत्त्वाकांक्षी आरोग्य विमा योजना आहे. या योजनेतून 996 प्रकारचे उपचार, शस्त्रक्रिया विनामुल्य केल्या जातात. या उपचार, शस्त्रक्रियांसाठी लाभार्थी कुटुंबांना प्रति कुटुंब प्रति वर्ष 1 लाख 50 हजार इतक्या रकमेपर्यंतचे आरोग्य विमा संरक्षण विमा तत्त्वावर पुरविले जाते. मुत्रपिंड प्रत्यारोपणासाठी ही रक्कम 2 लाख 50 हजार इतकी आहे. योजनेचा लाभ कुटुंबातील एकाला किंवा सर्व सदस्यांना घेता येतो.


या योजनेत समाविष्ठ रुग्णालयांमध्ये वॉर्डमधील खाटा, परिचारिका, विशेषज्ञ, भूलतज्ञ व वैद्यकीय अधिकारी यांचे शुल्क, तपासणी शुल्क, भुल, ऑक्सीजन, ऑपरेशन थिअटर व अतिदक्षता शुल्क, शस्त्रक्रियेसाठी लागणारे साहित्य, औषधे व द्रव्ये, कृत्रिम अवयव, रक्त संक्रमण, इन्प्लॉट, एक्स-रे व निदान चाचण्या, आंतररुग्णास भोजन, डिस्पोजेबल व कन्झुमेबल, वाहतुक आदी खर्च योजनेतून केला जातो. रुग्ण रुग्णालयात दाखल झाल्यापासून ते घरी जाईपर्यंतच्या तसेच उपचारादरम्यान काही गुंतागुंत झाल्यास त्यासह संपुर्ण उपचार विनामुल्य केले जातात.


योजनेच्या लाभासाठी पिवळी शिधापत्रिका, अंत्योदय अन्न योजना शिधापत्रिका, अन्नपूर्णा योजना शिधापत्रिका व केशरी ‍शिधापत्रिकाधारक कुटुंबे पात्र आहे. अवर्षणग्रस्त 14 जिल्ह्यातील शुभ्र शिधापत्रिकाधारक शेतकरी कुटुंबे, शासकीय अनाथाश्रमातील मुले, शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थी, शासकीय महिला आश्रमातील महिला, शासकीय वृध्दाश्रमातील जेष्ठ नागरिक, नोंदणीकृत पत्रकार व त्यांचे अवलंबित, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील नोंदणी जिवित बांधकाम कामगार व त्यांची कुटुंबे योजनेच्या लाभासाठी पात्र आहे.


प्रधानमंत्री जनआरोग्य योजना : 
महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेसोबत एकत्रितरित्या प्रधानमंत्री जनआरोग्य योजना सुरु करण्यात आली आहे. राज्याच्या आरोग्य योजनेतील 996 व केवळ प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेत समाविष्ठ 213 अशा एकून 1209 उपचारांसाठी या योजनेतून 5 लाखापर्यंतच्या रुग्णालयीन खर्चाचा लाभ कुटुंबांतील एक किंवा सर्व सदस्य घेऊ शकतात. सामाजिक, आर्थिक व जातनिहाय जनगणना 2011 च्या यादीतील कुटुंबे या योजनेचे लाभार्थी आहेत. या योजनेंतर्गत एका राज्यातील रुग्ण देशातील दुसऱ्या कोणत्याही राज्यातील अंगीकृत रुग्णालयात जावून शस्त्रक्रिया, उपचारांचा लाभ घेऊ शकतो.


राखीव उपचार व अंगीकृत रुग्णालये : 
 महात्मा ज्योतिराव फुले व प्रधानमंत्री जन आरोग्य या दोनही योजनेत समाविष्ठ 996 उपचारांपैकी 131 उपचार आणि फक्त प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेत समाविष्ठ असलेल्या 213 उपचारांपैकी 37 उपचार केवळ शासकीय रुग्णालयांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. राज्यात या योजनेतील अंगीकृत रुग्णालयांची कमाल संख्या एक हजार इतकी असून सद्यस्थितीत 999 रुग्णालये अंगीकृत आहे. त्यापैकी 282 शासकीय रुग्णालये व 717 खाजगी रूग्णालयांचा समावेश आहेत.





  Print






News - Wardha




Related Photos