महत्वाच्या बातम्या

 जात वैद्यता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी दलालापासून सावध राहण्याचे आवाहन


- बनावट प्रमाणपत्र बनवल्याप्रकरणी गुन्हा दाखल

विदर्भ न्यूज एक्सप्रेस

प्रतिनिधी / वर्धा : विद्यार्थी, पालक व निवडणूक लढविणाऱ्या व्यक्तींना जात प्रमाणपत्राची आवश्यकता असते. जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त करुन घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज सादर करावा लागतो. सदर अर्ज खाजगी एजंट मार्फत सादर न करता परिपूर्ण कागदपत्रासह जेट कॅफेवरुन ऑनलाईन अर्ज सादर करावा व दलालापासून सावध राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. बनावट जात वैधता प्रमाणपत्र बनविणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नागरिकांना जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त करुन घ्यावयाचे असल्यास परिपूर्ण कागदपत्रांसह जेट कॅफेवरुन अर्ज भरुन तो समितीकडे जमा करावा. काही अडचणी असल्यास जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या कार्यालयात चौकशी करावी. जर काही मध्यस्थ एजंट जात वैधता प्रमाणपत्र मिळवून देतो, असे सांगत असेल तर त्याची माहिती कार्यालयास द्यावी. माहिती देणाऱ्यांचे नाव गुप्त ठेवण्यात येईल.

बनावट जात वैधता प्रमाणपत्र तयार करुन त्याचा लाभ घेतल्याप्रकरणी समितीने ३० मे रोजी अर्जदारावर गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे अशा लोकांच्या भुलथापांना बळी पडू नये, असे आवाहन जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त एस.एम. चव्हाण यांनी केले आहे.

मागासवर्गीय विद्यार्थ्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या आरक्षित जागेवर प्रवेश तसेच नोकरी मिळविण्यासाठी जात वैधता प्रमाणपत्राची आवश्यकता आहे. जात प्रमाणपत्र पडताळणी करुन जात प्रमाणपत्र देण्याचे काम जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती करीत असते. राज्यातील ३६ जिल्ह्यात समित्या स्थापन करण्यात आल्या आहे.

जिल्ह्याच्या जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे जात प्रमाणपत्र पडताळणी अर्ज करतांना सर्वसामान्य विद्यार्थ्यांना व पालकांना तसेच महाविद्यालीय स्तरावरील शिक्षकांना अनेक अडचणींना सामोरे जाते लागते. त्याकरीता समितीने जात वैधता प्रमाणपत्र मिळविण्याकरीता कराव्या लागणाऱ्या प्रक्रियेची माहिती सर्व सामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी शाळा व महाविद्यालयांमध्ये जनजागृतीचे कार्यक्रम व सर्वसामान्यांमध्ये जनजागृती होण्यासाठी वारंवार ऑनलाईन वेबीनार घेतले. तसेच महाविद्यालयातील विज्ञान शाखेतील शिक्षकांच्या बैठका घेऊन जात प्रमाणपत्र पडताळणी बाबत मार्गदर्शन करण्यात आले. 

जिल्ह्यातील काही सायबर कॅफेधारक तसेच सेतू सुविधा केंद्रधारक जास्तीचे पैसे घेऊन तुमचे जात वैधता प्रमाणपत्र बनवून देतो, असे सांगून सामान्य लोकांची फसवणूक करीत असल्याचे निर्दशनास आले आहे. असे उपायुक्त तथा जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे सदस्य एस.एम. चव्हाण यांनी कळविले आहे.





  Print






News - Wardha




Related Photos