अंगणवाडी महिलांची बालविकास प्रकल्प कार्यालयावर धडक


- विविध मागण्याकडे वेधले प्रशासनाचे लक्ष
 प्रतिनिधी/  चामोर्शी :
अंगणवाडी सेविका व मदतनीस महिलांच्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य अंणवाडी कर्मचारी संघटना( आयटक) चामोर्शीच्या वतीने येथील बाजार चौकातुन बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
या मोर्चाचे नेतृत्व संघटनेचे अध्यक्ष देवराव चवळे, अमोल मारकवार, अनिता अधिकारी, रुपा पेंदाम, ज्योती कोल्हापुरे, कुंड संडावार यांनी केले. सदर मोर्चादरम्यान चामोर्शी तालुक्यातील अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांनी विद्यमान केंद्र व राज्य सरकारच्या धोरणाविरोधात नारेबाजी केली.
अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या थकीत दिवाळी बोनसची रक्कम अदा करण्यात यावी, किरकोळ खर्चाची रक्कम देण्यात यावी, गणवेशाचे पैसे अदा करण्यात यावे, कर्मचाऱ्यांचा प्रवास भत्ता व इंधन देयक अदा करण्यात यावे आदी मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला. यापुर्वी जिल्हा व तालुकास्तरावरील अधिकाऱ्यांची आयटक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेटुन अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांच्या समस्यांबाबत चर्चा केली होती. त्यावेळी अधिकाऱ्यांनी लवकरच अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे दिवाळी बोनस, इंधन बिल, गणवेशाचे पैसे व इतर समस्या निकाली काढण्याचे आश्वासन दिले होते. मात्र हे आश्वास हवेत विरले. त्यामुळे चामोर्शी तालुक्यासह परिसरातील अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी पसरली. बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढुन मागण्यांचे निवेदन बालविकास प्रकल्प अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्फत राज्य सरकारकडे पाठविण्यात आले आहे.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-02-16


Related Photos