महत्वाच्या बातम्या

 जिल्ह्यातील उद्योगांच्या अडीअडचणीबाबत उद्योग मित्र समितीची बैठक


विदर्भ न्यूज एक्सप्रेस

प्रतिनिधी / चंद्रपूर : जिल्ह्यात कार्यरत असलेल्या उद्योगांच्या अडीअडचणी, स्थानिक लोकांना रोजगार तसेच आजारी उद्योगांचे पुनर्वसन आदी विषयांबाबत अपर जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा उद्योग मित्र समितीची बैठक पार पडली.

बैठकीला जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक स्वप्नील राठोड, नाबार्डचे महाव्यवस्थापक फुलझेले, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक प्रशांत धोंगळे, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता एस.बी. काळे, कृषी उपसंचालक चंद्रकांत ठाकरे, महावितरणचे विजय राठोड, एमआयडीसी असोसिएशनचे अध्यक्ष मधुसूदन रुंगठा, औद्योगिक संघटनेचे प्रतिनिधी प्रदीप बुक्कावार, फ्लाय ॲश ब्रिक्स लिमिटेडचे मुकेश राठोड, मल्टी ऑर्गेनिक प्रा. लिमि. चे अलिम खान आदी उपस्थित होते.

औद्योगिक क्षेत्रामध्ये ज्या उद्योग घटकांनी भुखंड घेऊन बांधकाम केले नाही, इमारत बांधकाम प्रमाणपत्र सुध्दा घेतले नाही तसेच भुखंड घेऊन विहित कालावधीत उद्योग सुरू न केल्यामुळे जिल्ह्यातील १३ औद्योगिक वसाहतीतील १३० भुखंड धारकांना नोटीस देण्यात आली असून २५ भुखंड एमआयडीसी कडे परत आल्याचे प्रादेशिक अधिकाऱ्यांनी बैठकीत सांगितले. यावेळी जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रात कोणकोणती विकासकामे सुरू आहेत, याबाबत चर्चा करण्यात आली.

याव्यतिरिक्त रेडीअल वेल, बंधारा बांधणे, उद्योगांना पाणी पुरवठा करणे, मोठ्या उद्योगांनी सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना पाठबळ देणे, औद्योगिक घटकांना नियमित विद्युत पुरवठा होणे, फ्लॉय ॲश ब्रिक्स उद्योजकांना फ्लाय ॲश उपलब्ध करून देणे, आरबीआय च्या निर्देशानुसार एमएसएमई व मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेंतर्गत विनातारण कर्ज मिळवून देणे, औद्योगिक क्षेत्रातील खुल्या जागा दुकाने व शोरुम यांना न देता उद्योजकांना देणे, उद्योग भवनात बांधण्यात आलेले सर्व कार्यालये हस्तांतरीत करणे, एमआयडीसी क्षेत्रातील रस्त्यांची दुर्दशा, औद्योगिक उपक्रमात स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध करून देणे तसेच आजारी उद्योगांबाबत चर्चा करण्यात आली.





  Print






News - Chandrapur




Related Photos