महत्वाच्या बातम्या

 जलजीवन मिशनच्या प्रभावी अंमलबजावणी बाबत जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा


- पाण्याचे दुर्भिक्ष असलेल्या गावांना प्राधान्य देण्याच्या सूचना

विदर्भ न्यूज एक्सप्रेस

प्रतिनिधी / चंद्रपूर : ग्रामीण पाणी पुरवठा योजनांच्या कामांमध्ये येत असलेल्या अडीअडचणींचे निराकरण तसेच जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन अंतर्गत योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी आढावा घेतला.

वीस कलमी सभागृहात झालेल्या या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, उपवनसंरक्षक श्वेता बोड्डू, कुशाग्र पाठक, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता हर्ष बोहरे, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता एस.बी. काळे, विभागीय वन अधिकारी प्रशांत खाडे उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी गौडा म्हणाले, गत चार-पाच वर्षांपासून ज्या गावांमध्ये नियमितपणे पाण्याचे दुर्भिक्ष जाणवते, अशा गावांमध्ये जलजीवन मिशनची कामे प्राधान्याने करावीत. या गावांमधील सुरू असलेल्या कामांची प्रगती काय आहे, याचा अहवाल सादर करावा. पिण्याचे पाणी हा अतिशय महत्वाचा विषय असल्याने वन विभागाने आपापल्या कार्यक्षेत्रातील वनअधिकाऱ्यांना जलजीवन मिशनच्या कामांबाबत अवगत करावे. जलजीवन मिशनच्या कामाचा प्रस्ताव आल्यास परवानगी देण्याचे धोरण ठेवावे. विनाकारण प्रस्ताव प्रलंबित ठेवू नये, अशा सुचना त्यांनी दिल्या.

जिल्ह्यात सद्यस्थितीत जलजीवन मिशन अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या योजनांची संख्या १२८३ आहे. यापैकी २०८ कामे पूर्ण तर ९५७ कामे सुरू झाली असून सदर कामे प्रगतीपथावर असल्याचे कार्यकारी अभियंता बोहरे यांनी सांगितले.

बैठकीला ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे उपभियंता जे.सी. आत्राम, आदिवासी विकास विभागाचे नियोजन अधिकारी ए.एम. नंदनवार, डी.के. टिंगुसले यांच्यासह तालुक्यातील उपअभियंता उपस्थित होते.





  Print






News - Chandrapur




Related Photos