अल्पसंख्यांकासाठी असलेल्या योजनांची माहिती लाभार्थ्याना जनजागृतीव्दारे मिळवून द्या : ज.मो. अभ्यंकर


- राज्य अल्पसंख्यांक आयोगाच्या उपाध्यक्षांनी घेतला विविध विभागाचा आढावा
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी /  गडचिरोली :
पंतप्रधानांचे १५ कलमी कार्यक्रमांतर्गत अल्पसंख्याक नागरिकांना/ विद्यार्थ्यांना विविध योजनांव्दारे त्यांच्या पायाभूत सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्याकरीता निधी उपलब्‍ध करुन दिल्या जाते.  मात्र त्या योजनांची माहिती त्यांच्या पर्यंत पोहचत नसल्यामुळे प्रशासकीय सर्व संबंधित यंत्रणांनी जनजागृतीवर भर देवून, प्रसिध्दी माध्यमांचा वापर करुन अल्पसंख्यांकांच्या योजना त्यांच्या दारापर्यंत पोहचवा असे निर्देश अल्पसंख्यांक आयोगाचे उपाध्यक्ष ज. मो. अभ्यंकर यांनी आज येथे दिले.
 महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे उपाध्यक्ष ज. मो. अभ्यंकर आज गडचिरोली दौऱ्यावर आले असता त्यांनी अल्पसंख्याक समाजाच्या व्यक्तींची भेट घेतली तसेच  सर्व विभागाच्या प्रमुखांची कामासंदर्भात आढावा बैठक विश्रामगृहात आयोजित केली होती. त्याप्रसंगी ते बोलत होते.
 यावेळी  निवासी उपजिल्हाधिकारी संपत खलाटे , जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक एस. आर. पठारे, उप कार्यकारी अधिकारी पुराम, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ए.आर. लांबतुरे , शिक्षणाधिकारी कुचे, पाटील, समाजकल्याण निरीक्षक मेश्राम, तहसिलदार वासनिक, तहसिलदार भोयर, माहिती कार्यालयाचे प्रभाकर कोटरंगे, सहाय्यक नियोजन अधिकारी सुनिल पाटील, समाज कल्याणचे सारंग पाटील, स्वंयरोजगार व जिल्हा कौशल्य विकास अधिकारी शेंडे,  आदि. अधिकारी कर्मचारी प्रामुख्याने या आढावा बैठकीत उपस्थित होते.
 या आढावा सभेत अल्पसंख्यांक समाजातील तरुणांकरीता पोलीस शिपाई भरती पुर्व परिक्षा प्रशिक्षण वर्ग कार्यक्रम,  अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी मराठी भाषा फाउुंडेशन वर्ग सुरु करण्यासंदर्भात,  डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकरण योजना, अल्पसंख्यांक बहूल  शासनमान्य खाजगी शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्था व अपंग शाळांमध्ये पायाभू सुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजनांची माहिती यावेळी त्यांनी घेतली. तसेच  राज्यातील अल्पसंख्याक बहुल ग्रामीण क्षेत्रात मुलभूत पायाभूत सुविधा प्रदान करण्याबाबतची माहिती सुध्दा यावेळी त्यांनी अवगत केली.   अल्पसंख्यांक समाजातील इयत्ता १ ली ते १० वीच्या वर्गामध्ये शिकणाऱ्या गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना केंद्र शासनाची मॅट्रीकपुर्व शिष्यवृती  देण्यात येत आहे याबाबतसुध्‍दा माहिती  जाणून घेतली. व कोणताही विद्यार्थी यापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश अभ्यंकर यांनी दिली.
 अल्पसंख्यांक समाजाच्या  कल्याणासाठी  पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांनी घोषीत केलेल्या १५ कलमी कार्यक्रमानुसार राज्यातील मुस्लीम, ख्रीश्चन, बौध्द, शिख, पारशी, व जैन या अल्प संख्यांक समाजासाठी विविध योजना राबवित आहे. याच योजनांवर हा अल्पसंख्याक समाज निर्भर असल्यामुळे  योजनांची माहिती त्यांना प्राप्त करुन द्यावी असे ते म्हणाले.
 रमाई  घरकुल योजनेची माहिती सांगतांना प्रकल्प संचालक पठारे म्हणाले की, ६८०० प्रस्ताव प्राप्त झाले असून २००० प्रस्तावांना मंजुरी दिलेली आहे. मंजूर झाल्यानंतर करारनामा नुसार काम झाले नाही तर ते काम नामंजूर करुन उर्वरीत रक्कम परत मागवावी व  प्रतिक्षेत असलेल्या अर्जांचा विचार करुन त्यांना मंजु करावे असे अभ्यंकर यांनी सांगितले.
 नगरपरिषदेचे मुख्याधिकारी माहिती देतांना म्हणाले की, अल्पसंख्यांक बहूल भागाच्या विकासासाठी निधी कमी येतो.  जिल्हयात तीन नगरपरिषदा असून निधी वितरण करण्यास अडचण निर्माण होते, त्यांनी या पायाभूत सुविधांसाठी निधी वाढवून देण्याची मागणी केली.
 स्वयंरोजगार व मार्गदर्शन केंद्राचे शेंडे यांनी माहिती देतांना म्हणाले की, अल्पसंख्याक समाजातील ५४० युवकांना आतापर्यंत प्रशिक्षण देण्यात आले आहे.  यामध्ये ऑटो, हॉस्पीटलायझेशन, कन्सट्रक्शन, वेल्डींग इत्यादींचे प्रशिक्षण दिल्या जाते. हॉटेल मध्ये काम करतांना येणाऱ्या ग्राहकांसोबत बोलतांना त्यांना कशाप्रकारे आदारातिथ्याने बोलायेचे याचेही प्रशिक्षण दिले जाते.  मुंबई, पुणे, कोल्हापूर, औरंगाबाद याठिकाणी कुशल कामगार म्हणून युवक काम करीत आहेत.  तसेच परदेशातसुध्दा येथील १३ युवक काम करीत असल्याची माहिती यावेळी दिली. उपाध्यक्ष अभ्यंकर यांनी ऐवढया कमी काळात (३ महिने ) प्रशिक्षण देऊन रोजगार उपलब्ध करुन देत असल्याबध्दल समाधान व्यक्त केले.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-02-15


Related Photos