आगामी लोकसभा निवडणुकीत आता मतदारराजा थेट आचारसंहिता भंगाची तक्रार करू शकणार


-  निवडणूक आयोगाने सी-व्हिजिल मोबाइल ॲप केले विकसित 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
निवडणुकामध्ये विविध राजकीय पक्षांविरोधात आदर्श आचारसंहिता भंगाच्या तक्रारी केल्या जातात. पण सबळ पुरावे नसल्याने कारवाईही होत नाही. मात्र, आगामी लोकसभा निवडणुकीत आता मतदारराजा थेट आचारसंहिता भंगाची तक्रार करू शकणार आहे. त्यासाठी निवडणूक आयोगाने सी-व्हिजिल मोबाइल ॲप विकसित केले आहे. लोकसभा निवडणुकीत प्रथमच या ॲपचा वापर होणार आहे. या ॲपद्वारे वादग्रस्त भाषणे किंवा घटनांची लाइव्ह तक्रार निवडणूक यंत्रणेकडे करणे शक्य होणार आहे. 
निवडणूक आयोगाने सी-व्हिजिल मोबाइल ॲप विकसित केले आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत मतदारांना आमिष दाखवणाऱ्या वस्तूंचे पुरावे, नेत्यांची वादग्रस्त भाषणे या ॲपद्वारे रेकॉर्ड केली जाऊ शकतात. हे सर्व रेकॉर्डिग व पुरावे निवडणूक आयोगाकडे कारवाईसाठी पाठवता येतील. विशेष म्हणजे एखाद्या पक्षाची जाहीर सभा, रॅली, बैठक वा नेत्याचे लाइव्ह भाषणही थेट ॲपशी जोडता येते. तक्रार थेट संबंधित निवडणूक अधिकारी आणि निवडणूक आयुक्तही पाहू शकतात. या ॲपवर मतदारांना आदर्श आचारसंहिता भंगाची तक्रार, तर करता येईलच; याशिवाय फोटो, व्हिडिओही टाकता येणार आहे. विशेष म्हणजे, पुराव्यांची खात्री करून केवळ एक ते दीड तासात कार्यवाही किंवा कारवाई कोठवर आली, हे तक्रारदारास कळणार आहे. या ॲपमुळे संबंधित जिल्हा निवडणूक अधिकारी, सहायक निवडणूक अधिकारी व संबंधित पथकास दोषींवर कारवाई करता येणे शक्य होणार  आहे. 
फोटो व व्हिडिओ शूट केल्यानंतर युजरला फक्त पाचच मिनिटांचा वेळ असेल. आधीच काढलेला किंवा फॉरवर्ड व्हिडिओ-फोटो या ॲपवर अपलोड करता येणार नाही. तसेच ॲपवरून काढलेला फोटो-व्हिडिओ मोबाइलच्या गॅलरीत सेव्ह होणार नाही.    Print


News - Rajy | Posted : 2019-02-15


Related Photos