दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट, हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आज केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षाविषयक समितीची बैठक


वृत्तसंस्था / नवीदिल्ली  :  अवंतीपुरा दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली असून शहीद वीर जवानांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.   दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात ४४ जवान शहीद झाले आहेत.  काश्मीरमध्ये झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षाविषयक समितीची  आज १५ फेब्रुवारी रोजी  बैठक होणार आहे. त्यात काश्मीरमधील सुरक्षा व्यवस्थेवर चर्चा केली जाणार आहे. 
गृहमंत्री राजनाथ सिंह यांनीही जम्मू आणि काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्याशी फोनवरुन संपर्क साधला असून सिंह हे  घटनास्थळाला भेट देणार आहेत. तसेच वरिष्ठ सुरक्षा आणि पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेऊन पुढील कृतीबाबत आढावा घेतील. 
दहशतवाद्यांच्या या भ्याड हल्ल्यानंतर सोशल मीडियावरुन नेटीझन्सने संताप व्यक्त केला आहे. तर, मोदीजी पुन्हा एक सर्जिकल स्ट्राईक हवाय, अशी मागणीही अनेकजण करत आहेत.  
जम्मू-काश्मीरमध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) जवानांच्या ताफ्यावार पाकिस्तान पुरस्कृत ‘जैश-ए-मोहम्मद’ या दहशतवादी संघटनेने केलेल्या भयंकर दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला जाईल. संपूर्ण भारताला हादरवून टाकणाऱ्या या हल्ल्याचा सूड घेण्यासाठी जे काही करावे लागेल ते निश्चितच केले जाईल, अशी ग्वाही केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी समस्त भारतीयांना दिली. हा पाकिस्तान आश्रित आणि पुरस्कृत हल्ला आहे. अशा दहशतवादी हल्ल्याने शांततेला सुरुंग लावू पाहणाऱ्यांचा डाव कणखरपणे उधळून लावण्यात सरकार कटीबद्ध आहे, अशी हमी गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी भारतीयांना दिली.    Print


News - World | Posted : 2019-02-15


Related Photos