महत्वाच्या बातम्या

 केंद्र, राज्य सरकार अत्याचाऱ्यांना पाठिशी घालणारे : शिवानी वडेट्टीवार 


- चंद्रपुरात जिल्हाध्यक्ष राजेश अडूर यांच्या नेतृत्त्वात युवक काँग्रेसचे आंदोलन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : जागतिक कीर्तीच्या महिला कुस्तीपटू न्याय मिळावा म्हणून महिनाभरापेक्षा अधिक काळापासून आंदोलन करीत आहेत. मात्र, केंद्र सरकारने न्याय देण्याऐवजी त्यांना फरफटत नेऊन जेलमध्ये टाकले आणि आरोप असलेल्या खासदाराला नवीन संसद उद्घाटनाला बोलाविले. यातून केंद्र सरकार आरोपीला पाठिशी घालत असल्याचे दिसून येते. एकंदरीत केंद्र आणि राज्यातील सरकार हे महिला विरोधी असून, अन्याय आणि अत्याचाराला पाठिशी घालणारे असल्याचा आरोप युवक काँग्रेसच्या प्रदेश महासचिव शिवानी वडेट्टीवार यांनी केला.


लैंगिक छळ प्रकरणी महिला कुस्तीपटू करीत असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी, महाराष्ट्र सदनातून क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे पुतळे हटविल्या प्रकरणी जिल्हाध्यक्ष राजेश अडूर यांच्या नेतृत्त्वात चंद्रपूर शहर जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने शनिवारी ३ जूनला सायंकाळी ६ वाजता गांधी चौकात आयोजित आंदोलनात त्या बोलत होत्या. यावेळी माजी नगरसेवक नंदू नागरकर, संतोष लहमगे, दुर्गेश कोडाम, गोपाल अमृतकर, नरेन्द्र बोबडे महासचिव प्रदेश युवक कांग्रेस रूचित दवे ग्रामीण जिल्हा युवक अध्यक्ष शांतानु धोटे युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष रमिज शेख, भानेश जंगम, कुणाल चहारे, सूरज कन्नूर, विनोद वाघमारे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
शिवानी वडेट्टीवार पुढे म्हणाल्या, केंद्रात भाजप सत्तेत आल्यापासून महिला अत्याचाराच्या घटना मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. अनेक प्रकरणात भाजपचे लोकप्रतिनिधीच आरोपी आणि दोषी आढळून आले आहेत. मात्र, त्यांच्यावर कुठलिही कारवाई झालेली नाही. केंद्रातील मोदी सरकार ब्रिजभूषण सिंग यांच्यावर कारवाई करण्याऐवजी कुस्तीपटूंचे आंदोलन उधळून लावण्यासाठी पोलिस बळाचा वापर करीत आहे. ही बाब निषेधार्ह आहे. तर, दुसरीकडे सावरकर जयंतीला बहुजनांचे श्रद्धास्थान असलेल्या क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे पुतळे हटवून भावना दुखावण्याचे काम केले आहे.


यावेळी जिल्हाध्यक्ष राजेश अडूर यांनी केंद्र सरकार महिलांना न्याय मिळवून देण्याचे केवळ ढोंग करीत आहेत. प्रत्यक्षात देशासाठी पदके जिंकणाऱ्या कुस्तीपटूंना न्याय मागण्यासाठी रस्त्यावर यावे लागते, ही बाब संतापजनक आहे. केंद्र सरकारने या महिला कुस्तीपटूंना तातडीने न्याय द्यावा, अन्यथा युवक काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा दिला. तर, उपस्थित मान्यवरांनी, केंद्र सरकारच्या धोरणावर कडाडून टीका केली. यावेळी केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. कार्यक्रमापूर्वी ओडीसा राज्यात रेल्वे अपघातात मृत्यू पावलेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.


आंदोलनात प्रवीण कुमार वडलुरी, हीरा प्रफुल जाधव, सोनू चिवांडे, प्रकाश देशभ्रतार, कोंड्रा भैया, ऐजाज प्रणय यादव, प्रितम आतिफ यांच्यासह युवक काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.





  Print






News - Chandrapur




Related Photos