महत्वाच्या बातम्या

 ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर यांचे निधन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / मुंबई : मुंबई-ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदी म्हणजेच सुलोचना लाटकर यांचे आज निधन झाले. त्यांचे वय ९४ होते. त्यांनी ४०० हून अधिक चित्रपटांत भूमिका केल्या.

अनेक चित्रपटांतील त्यांच्या आईच्या भूमिका गाजल्या. प्रकृती अस्वास्थ्यामुळे आज त्यांना दादरच्या शुश्रुषा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सुलोचना या गेल्या अनेक वर्षांपासून अभिनय क्षेत्रापासून दूर होत्या. सुलोचना दीदींनी ४० च्या दशकात मराठी सृष्टीत अभिनेत्री म्हणून पदार्पण केले. प्रमुख भूमिका साकारत त्यांनी जवळपास दोन दशके प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. सोज्वळ नायिका ते सहाय्यक अभिनेत्री तसेच मायाळू आईच्या भूमिका त्यांनी आपल्या सहजसुंदर अभिनयाने साकारल्या.

पडद्यावर आणि पडद्याच्या मागेही चित्रपटसृष्टीवर मायेची पाखर घालणारी आई ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर यांच्या निधनामुळे काळाने आपल्यातून ओढून नेली आहे. मराठीसह, हिंदी चित्रपट सृष्टीने एक लोभस, सहज अभिनयाने अनेकांच्या मनमनात घर केलेली एक महान अभिनेत्री आपण गमावली आहे, अशा शोकमग्न भावना करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रख्यात अभिनेत्री पद्मश्री, महाराष्ट्र भूषण सुलोचना दीदी यांना निधनाबद्दल भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

शोकसंदेशात मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले आहे की, सुलोचना दीदींनी मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. त्यांनी आपल्या व्यक्तिरेखांनी विशेषतः आई च्या भूमिकेने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. दोन्ही चित्रपट सृष्टीतील अनेक कुटुंबांशी त्यांचे जिव्हाळ्याचे नाते राहिले आहे. त्या जशा पडद्यावर प्रेमळ, सोशिक दिसत, तश्याच त्या अनेकांसाठी मायेचा आधार होत्या. त्यांच्या निधनामुळे चित्रपट सृष्टीतील अनेकांना पोरकेपणाची भावना निर्माण झाली असेल. काळाने त्यांना आपल्यातून ओढून नेल्याने आपण एक चित्रपटसृष्टीवर मायेची पाखर घालणारी आई गमावली आहे, ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदी यांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या कुटुंबियांना आणि चित्रपट सृष्टीतील स्नेह्यांना हा आघात सहन करण्याची ताकद मिळावी, अशी प्रार्थनाही मुख्यमंत्र्यांनी केली आहे.





  Print






News - Rajy




Related Photos