अखिल भारतीय नाट्य परिषदेने झाडीपट्टीच्या रंगभूमीकडे गांभिर्याने बघावे : मकरंद अनासपुरे


- सिने अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी साधला विदर्भ न्यूज एक्सप्रेसशी संवाद
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली
: मागील शेकडो वर्षांपासून अविरतपणे सुरू असलेली झाडीपट्टी रंगभूमीवरील नाटके अतिशय वेगळ्या आणि नवनवीन विषयांची आहेत. येथील नाटकांना, कलावंतांना अजून वर आणण्यासाठी अखिल भारतीय नाट्य परिषदेने गांभिर्याने बघावेे, असे मत प्रसिध्द मराठी सिनेअभिनेते मकरंद अनासपुरे यांनी केले.
मकरंद अनासपुरे हे झाडीपट्टीतील ‘गद्दार‘ या नाटकाच्या प्रयोगासाठी गडचिरोली जिल्ह्यात आहेत. यावेळी गडचिरोली येथे विदर्भ न्यूज एक्सप्रेसशी त्यांनी मनमोकळा संवाद साधला. यावेळी झाडीपट्टीतील प्रसिध्द नाट्य कलावंतर अरविंद झाडे, विदर्भ न्यूज एक्सप्रेस चे उपसंपादक होमदेव कुरवटकर , एच.के. प्रोडक्शन यु ट्युब चॅनेलचे संचालक होमदेव कोसमसिले, दुष्यंत कुकडकर उपस्थित होते.
पुढे बोलताना मकरंद अनासपुरे म्हणाले, झाडीपट्टीतील नाटकांचा हंगाम साधारणतः पोळ्यापासून होळीपर्यंत चालणारा आहे. खरीपाची सुगी झाल्यानंतर नाटकांचा भरगच्च हंगाम सुरू होतो. गावा - गावांतून झाडीपट्टीतील नाटकांना उत्तम पसंती मिळते. आपण आतापर्यंत या रंगभूमीवर साधरणतः २० ते २५ नाटके केली आहेत. यामुळे येथील प्रेक्षकांचा प्रतिसाद अनुभवला आहे. येथील नाटकांचे वेगवेगळे आशय असतात. सध्या मुंबई पुण्याकडील नाटके ३ अंकावरून दोन अंकी करण्यात आलेली आहेत. त्यांचे प्रयोग केवळ दोन ते अडीच तास चालतात. मात्र झाडीपट्टीत अनेक वर्षांपासून सुरू असलेली कलाकृती आजही त्याच पध्दतीने सुरू आहे. या परिसरातील नाटके ६ ते ७  तास चालतात आणि उत्तम नाटकांना प्रेक्षक भरभरून प्रतिसादही देतात. वेगवेगळ्या समस्यांना हात घालणारी नाटके आहेत. झाडीपट्टीतील नाटकांचे संगीतसुध्दा लाईव्ह आहे. व्यावसायीक नाटकांमध्ये मुख्यतः रेकाॅर्डेड संगीत वापरले जाते. यामुळे नाटकांना वेगळेपणा आहे.
प्रेक्षक कुठलाही असो आणि रंगभूमी कोणतीही असो चांगल्या नाटकांना प्रेक्षक नक्कीच प्रतिसाद देणार. कला क्षेत्रात चांगले - वाईट असतेच, असेही अनासपुरे म्हणाले. 
झाडीपट्टीतील नाटकांच्या प्रयोगांची संख्या वाढविण्यासाठी प्रसिध्दीची मोठी गरज आहे. सध्याच्या सोशल मीडीयासारख्या जलद माध्यमातून नाटकांची प्रसिध्दी करणे गरजेचे आहे. तसेच शासकीय स्तरावरूनही योग्य ती मदत मिळायला हवी. नाट्य कलावंतांना प्रोत्साहन मिळावे, सवलती मिळाव्यात. मुंबई, पुणे कडील कलावंतांना ज्याप्रकारे जीवनगौरव किंवा इतर पुरस्कार देवून गौरविले जाते. त्याचप्रकारे अखिल भारतीय नाट्य परिषदेने झाडीपट्टीत ३० ते ४० वर्षांपासून कला सादर करीत असलेल्या कलावंतांना गौरविले पाहिजे. यावर्षी सुदैवाने नागपूर येथे नाट्य संमेलन आहे. यामुळे झाडीपट्टीच्या नाटकांना वाव मिळू शकेल या दृष्टीने बघितले पाहिजे, असेही मकरंद अनासपुरे म्हणाले.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-02-13


Related Photos