वेडसर महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू : कुरुड येथील बसस्थानकात होती विव्हळत


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / कोंढाळा (देसाईगंज) :
परिसरातील गावोगावी भटकंती करणारी महिला कुरुड येथील मोडकडीस आलेल्या बसस्थानकात विव्हळत असतांना समाजसेवक अरुन कुंभलवार यांच्या निदर्शनास आली. त्यांनी याबाबतची माहिती देसाईगंज पोलिसांना देऊन महिलेला उपचारार्थ देसाईगंज ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याने तिला जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र उपचारादरम्यान वेडसर महिलेचा ९ फेब्रुवारी रोजी मृत्यू झाला . 
वेडसर महिला कित्येक दिवसांपासून गावोगावी भटकत होती.जिथे मिळेल तिथे ती खायची, ज्यानं जे दिले ती घ्यायची व आपले जीवन जगत आपला प्रवास भटकंती द्वारे पूर्ण करायची. मात्र ९ फेब्रुवारी रोजी कुरुड येथील मोडकडीस आलेल्या बसस्थानकात विव्हळत असतांना कोंढाळा येथील समाजसेवक अरुन कुंभलवार यांना ती दिसून आली असता, त्यांनी कुरुड येथील तंटामुक्ती अध्यक्ष यांना सदर घटनेची माहिती दिली. त्यांनी देसाईगंज पोलिस स्टेशनला कळविले. त्यानंतर देसाईगंज पोलिसांनी महिलेला ग्रामीण रुग्णालय देसाईगंज येथे भरती केले. मात्र त्या महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याने तिला गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. परंतु काळाचा ओघ तिच्यावर बरसला व रात्री १०.४९ मिनिटांनी जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्या वेडसर महिलेची अजूनही ओळख पटलेली नसून पुढील तपास बिट जमादार करकाडे मेजर व देसाईगंज पोलीस करीत आहेत.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-02-12


Related Photos