स्टॉर स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेमार्फत ४ हजार १८१ लाभार्थ्यांना प्रशिक्षण


-२ हजार ८६८ प्रशिक्षणार्थींना रोजगार
-३२२ प्रशिक्षणार्थ्यांना नोकरी
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : 
बँक ऑफ इंडिया अंतर्गत स्टॉर स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था भंडारा ८ मार्च २०१० पासून भंडारा जिल्हयात कार्यरत असून आतापर्यंत १५५ प्रशिक्षण गटाच्या माध्यमातून ४ हजार १८१ प्रशिक्षणार्थींना संस्थेमार्फत प्रशिक्षण देण्यात आले आहे. २ हजार ८६८ प्रशिक्षणार्थींना रोजगार मिळाला असून या पैकी १ हजार २६७ प्रशिक्षणार्थींनी बँकेचे कर्ज घेवून स्वत:चा स्वयंरोजगार सुरु केला आहे. तसेच ३२२ प्रशिक्षणार्थींना नोकरी मिळाली असल्याचे स्टॉर स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेचे संचालक एन.वाय. सोनकुसरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
स्टॉर स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या १ वर्षपूर्ती निमित्त पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. या पत्रकार परिषदेच्या अध्यक्षस्थानी अग्रणी बँकेचे व्यवस्थापक आर.एस. खांडेकर होते. जिल्हा माहिती अधिकारी रवी गिते यांची प्रमुख उपस्थित होती.
या प्रशिक्षणार्थीमध्ये बी.पी.एल १ हजार ९९९, महिला २ हजार ३३० प्रशिक्षणार्थी असून त्याची टक्केवारी ६९ टक्के अशी आहे. या प्रशिक्षण संस्थेत सेल फोन रिपेरींग अँड सर्व्हिस, दुग्ध व्यवसाय व गांढूळ खत, वुमन टेलर, बकरी पालन, इलेक्ट्रीक मोटार रिवायडींग व रिपेअर, इंडीपी फॉर लघु उद्योजक, फोटोग्राफी अँड विडिओग्राफी, घरेलु अगरबत्ती उद्योग, वेल्डींग अँड टसर उत्पादन, मेन टेलर, कुक्कुट पालन, प्लबिंग अँड सॅनिटरी वर्क, मोमबत्ती तयार करणे, लाईट मोटार व्हेईकल ड्रायव्हिंग, मत्स्यपालन, ब्युटी पॉर्लर, दुचाकी दुरुस्ती, मधुमक्षिका पालन आदींचे प्रशिक्षण दिले जात असल्याचे  सोनकुसरे यांनी सांगितले.
प्रशिक्षणासाठी उमेदवाराचे वय १८ ते ४५ वयोगटातील असावे. कमीत कमी १० वा वर्ग पास/नापास, व्यवसायातील अनुभव असणाऱ्या उमेदवारास प्राध्यान्याने प्रशिक्षणासाठी निवड करण्यात येईल. अर्ज संस्थेत नि:शुल्क उपलब्ध असून नजिकच्या बँक ऑफ इंडियाच्या शाखेतही उपलब्ध आहेत. तसेच बाहेर गावाच्या प्रशिक्षणार्थ्यांना राहण्याची सुविधा संस्थेत उपलब्ध असल्याचे सोनकुसरे यांनी सांगितले.  Print


News - Bhandara | Posted : 2019-02-12


Related Photos