खर्रा खाणार नाही, खाऊ देणार नाही : अहेरीत १,७२४ विद्यार्थ्यांनी केला निर्धार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / अहेरी  :
तालुक्यातील ८ शाळांमध्ये व्यसनमुक्त संकल्प शाळा उपक्रमांतर्गत मुक्तिदिन कार्यक्रम घेण्यात आला. तब्बल १ हजार ७२४ विद्यार्थ्यांनी यात सहभागी होत खर्रा खाणार नाही, खाऊ देणार नाही, असा निर्धार व्यक्त करीत व्यसनमुक्त राहण्याचा संकल्प केला.
खेळीमेळीच्या वातावरणात विद्यार्थ्यांना खर्रा तसेच तंबाखूजन्य पदार्थाचे दुष्परिणाम कळावे यासाठी मुक्तिपथ द्वारे गडचिरोली जिल्ह्यातील शाळांमध्ये मुक्तिदिन उपक्रमांतर्गत तंबाखूमुक्त संकल्प शाळा कार्यक्रम घेऊन शिक्षकांच्या सहकार्यातून पत्रलेखन, प्रश्नमंजुषा, पोस्टर मेकिंग आणि गीतगायन असे कार्यक्रम घेऊन खर्रा आणि तंबाखूजन्य पदार्थाचे दुष्परिणाम सांगण्यात येत आहे. यांतर्गत तालुक्यातील भगवंतराव विद्यालय अहेरी येथील २९६, राजे धर्मराव हायस्कूल नागेपल्ली १५०, शासकीय मुलांची निवासी शाळा वांगेपल्ली १७८, संत मानवदयाल आश्रमशाळा अहेरी २७५, शासकीय आश्रमशाळा खमनचेरू २५०, राजे धर्मराव शाळा महागाव २७५, विमलताई आल्लोलवार शाळा बोरी येथील १२० अशा एकूण १ हजार ७२४ विद्यार्थ्यांनी मुक्तिदिन कार्यक्रमात सहभाग नोंदविला.
शाळांमध्ये आयोजित कार्यक्रमात सर्वप्रथम खर्रा या पदार्थाचे शरीरावर होणारे दुष्परिणाम सांगणारा ‘यमराजाचा फास’ हा लघुचित्रपट विद्यार्थी आणि शिक्षकांना दाखवून त्यावर चर्चा करण्यात आली. यानंतर पत्रलेखन उपक्रम घेण्यात आला. खर्रा आणि तंबाखू वाईट असून ते खाऊ नका असे पालकांना आणि नातेवाईकांना आवाहन करणारी पत्रे विद्यार्थ्यांनी लिहिली. पोस्टर मेकिंगमध्ये तंबाखू, खर्रा वाईट आहे ते खाऊ नका, त्याला नाही म्हणा, त्यापासून कर्करोग होतो हे दाखविणारी चित्रे विद्यार्थ्यांनी रेखाटली. सोबतच या पदार्थांमुळे प्रदूषण होत असल्याचेही चित्रांतून दाखविले. गीतगायनमध्ये तंबाखू, खर्रा, दारू हे पदार्थ सोडण्याचे आवाहन करणारी गाणी विद्यार्थांनी जल्लोषात गायली. प्रश्नमंजुषा कार्यक्रमात विद्यार्थ्याचा तंबाखू आणि दारूविषयी कल, त्यांना असलेली या पदार्थाची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. व्यसनमुक्त राहण्याचा व इतरानाही खर्रा व दारूचे दुष्परिणाम सांगण्याचा संकल्प विद्यार्थ्यांनी यावेळी केला. मुक्तिपथ तालुका चमूने या कार्यक्रमाचे नियोजन केले. सर्व शाळेतील शिक्षकांनी या उपक्रमासाठी सहकार्य केले.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-02-12


Related Photos