गोगाव येथे नागोबादेव जत्रेत उसळली भाविकांची गर्दी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : 
जिल्हा मुख्यालयानजिक असलेल्या गोगाव येथे नागोबा देवस्थान परिसरात रथसप्तमीच्या पर्वावर आज  १२ फेब्रुवारी रोजी जत्रा उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. जत्रेनिमित्ताने गोगाव येथे नागोबा देवाच्या दर्शनासाठी हजारो भाविकांनी  गर्दी केली आहे.
नागोबा देवस्थान कमिटीच्यावतीने दरवर्षी रथसप्तमी निमित्ताने जत्रा उत्सवाचे आयोजन करण्यात येते. गोगाव येथील नागोबादेव हे परिसरातील भाविकांसाठी श्रद्धास्थान आहे. याठिकाणी परिसरातील गोगाव, गडचिरोली, अडपल्ली, महादवाडी, कुऱ्हाडी , चुरचुरा, दिभना, जेप्रा, राजगाटा आदी गावातून शेकडो भाविक हजेरी लावतात. यात्रा उत्सवाचा शुभारंभ रविवारीच करण्यात आला आहे. रविवारी गावातील पुजारी चेपटू शेंडे यांच्या मार्गदर्शनात घोडादेवाची स्थापना करण्यात आली. यानंतर काल ११ फेब्रुवारी रोजी आरती  करण्यात आली. आज मोठ्या संख्येने भाविक पूजा अर्चा करीत आहेत.  
जत्रेसाठी गावात दाखल होणाऱ्या भाविकांच्या मनोरंजनासाठी गोगाव व अडपल्ली येथे नाट्यप्रयोगांची रेलचेल आहे. गोगाव येथे ‘जंगलराज’ व ‘हेच का माझं बाळ’ तसेच अडपल्ली येथे ‘कर्तव्य’ या नाट्यप्रयोगाचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्यावतीने जत्रेसाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. जत्रेत विविध वस्तूंची दुकाने सजलेली आहेत. विरंगुळ्याची साधनेसुद्धा असून तरुणाई मनमुराद आनंद लुटताना दिसून येत आहे.   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-02-12


Related Photos