पोलिसांनी केला १५ ड्राम सडवा नष्ट : असरअली पोलिसांची कारवाई


- जंगलात सापडले दारूचे साठे
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका  प्रतिनिधी / सिरोंचा :
तालुक्यापासून ३५ किमी लांब चिंतरवेला या गावी असरअली पोलिसांनी धाड टाकून नदीकिनारी जंगलात लपविलेला १५ ड्राम गुळाचा सडवा शोधून तो नष्ट केला. सोबतच दारू गाळण्यासाठी वापरत येणाऱ्या साहित्याची होळी केली. पोलीस निरीक्षक दराडे यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई करण्यात आली.
तालुक्यातील चिंतरवेला या गावात मोठ्या प्रमाणात गावठी दारू विकली जाते. मुक्तिपथ द्वारे या गावात संघटन तयार करण्याचे वारंवार प्रयत्न केले जात आहेत. पण गावकरी याला दाद देत नसून दारूची मोठ्या प्रमाणात विक्री करतात. यात महिलांचाही मोठा सहभाग आहे. या गावामुळे जवळची पेंटीपाका, तुमनूर, अरडा ही गावे त्रस्त आहेत. येथील दारूविक्रेत्यांवर कारवाई करण्याची मागणीही ते वारंवार करीत असतात. काहीच दिवसांपूर्वी मुक्तिपथ तालुका चमूने देखील या गावातील दारूच्या समस्येबाबत पोलिसांसोबत चर्चा केली होती. मंगळवारी  असरअली पोलीस ठाण्याचे निरीक्षक दराडे यांच्या मार्गदर्शनात पोलिसांनी सापळा रचून  चिंतरवेला येथील नदीलगतच्या परिसरात धाड मारून परिसर पिंजून काढला. यावेळी त्यांना १५ ड्राम गुळ सडवा आणि दारूभट्ट्या आढळून आल्या. पोलिसांनी हा सर्व सडवा नष्ट केला. सोबतच सर्व साहित्यही नष्ट केले. दारूभट्टीचालकांनी मात्र पळ काढला. या भागात वारंवार धाडसत्र राबविले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-02-12


Related Photos