टीसीने अल्पवयीन मुलीचा अपहरण करून केला विनयभंग


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर :
विनातिकीट आढळलेल्या अल्पवयीन मुलीचे टीसीने अपहरण करून विनयभंग केल्याची खळबळजनक घटना नागपूर रेल्वेस्थानकावर  २१ जानेवारीला घडली आहे. या प्रकरणी सीताबर्डी पोलिसांनी अज्ञात टीसीविरुद्ध गुन्हा दाखल करून हे प्रकरण नागपूर लोहमार्ग पोलिसांकडे वर्ग केले आहे. लोहमार्ग पोलिसांनी संबंधीत टीसीविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे. .
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपुरात राहणाऱ्या दोन अल्पवयीन मुली २१ जानेवारी रोजी घरून निघाल्या. त्या अजनी रेल्वेस्थानकावर पोहोचल्या. विनातिकीट त्या गोंदियाकडे जाणाऱ्या गाडीत बसल्या. गाडी नागपूर रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफार्म क्रमांक २ वर पोहोचली असता टीसीने त्यांची चौकशी केली. मात्र, त्यांच्याकडे तिकीट नव्हते. त्या अल्पवयीन असल्याने टीसीने त्यांना लोहमार्ग पोलिस, आरपीएफ किंवा रेल्वे चाईल्ड लाईनच्या सुपूर्द करायला पाहिजे होते. मात्र, टीसीने दोघींनाही थांबवून ठेवले. ड्यूटी संपल्यानंतर स्वत:च्या गाडीने अजनी रेल्वे क्वॉर्टरमध्ये घेऊन गेला. क्वॉर्टरमध्ये सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास त्याने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला. त्यानंतर पीडित मुलीच्या आईला ही बाब समजताच सीताबर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेची गंभीरता लक्षात घेता सीताबर्डी पोलिसांनी अज्ञात टीसीविरुध्द गुन्हा नोंदवून हे प्रकरण लोहमार्ग पोलिसांकडे वर्ग केले. लोहमार्ग पोलिसांनी ७ फेब्रुवारीला गुन्ह्याची नोंद केली आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक डाबरे करीत आहेत. लोहमार्ग पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज मागितले असून टीसी कार्यालयाला पत्र दिले आहे. त्यामुळे लवकरच आरोपी टीसीची ओळख पटणार आहे.  Print


News - Nagpur | Posted : 2019-02-12


Related Photos