महत्वाच्या बातम्या

 कृउबा समिती मार्फत कल्याणकारी योजनांतून शेतकऱ्यांचा विकास साधणार : माजी मंत्री वडेट्टीवार


- सिंदेवाही तालुक्यातील नवरगाव येथील उपबाजारात आधारभूत धान खरेदी केंद्राचे उद्घाटन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / सिंदेवाही : जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना साठवणुकीच्या जागे अभावी कमी भावात शेतमालाची विक्री करावयास लागत होती. यातच शासनाने जाचक अटी लादल्यामुळे उन्हाळी धान खरेदी केंद्र बंद होण्याच्या मार्गावर असताना राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून धान खरेदी करण्याचा मार्ग मोकळा केला. तर सिंदेवाही कृषी उत्पन्न बाजार समिती एक हाती सत्ता दिल्याने विविध उपाययोजना करून कल्याणकारी योजनातून शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास साधणार असे प्रतिपादन राज्याचे माजी मंत्री, काँग्रेस नेते, आमदार विजय वडेट्टीवार यांनी केले. ते नवरगाव येथील उपबाजारात आधारभूत धान खरेदी केंद्राच्या उद्घाटना प्रसंगी बोलत होते.


आयोजित कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून कृउबा समितिचे माजी सभापती शामराव गहाने, विद्यमान सभापती तथा काँग्रेस तालुकाध्यक्ष रमाकांत लोधे, उपसभापती दादाजी चौके, माजी तालुका अध्यक्ष अरुण कोलते, वीरेंद्र जयस्वाल, सिंदेवाही नगराध्यक्ष स्वप्निल कावळे, सरपंच राहुल बोडणे, कृउबा समिती संचालक नरेंद्र भैसारे, जानकिराम वाघमारे, जगदीश कामडी प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते.
शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्याकरिता व शेती व्यवसायाच्या विकासासाठी आपण प्रयत्नशील असून कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सभापती पदावर निवडून देणार्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, अशी ग्वाही नवनियुक्त सभापती रमाकांत लोधे यांनी प्रास्ताविकातून दिली.


तर पुढे बोलताना माजी मंत्री आ. वडेट्टीवार म्हणाले की, काँग्रेस पक्षाने नेहमीच शेतकऱ्यांची हित जोपासले आहे. मी राज्यमंत्री असताना वारंवार केलेल्या पाठपुराव्याची दखल घेऊन त्यावेळच्या पक्ष्याध्यक्षा सोनिया गांधी यांनी गोसेखुर्द प्रकल्पाला मंजुरी देण्यासाठी प्रयत्न चालवले तर माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी विदर्भाच्या विकासात मानाचा तुरा रोवणाऱ्या गोसेखुर्द प्रकल्पासाठी 5 हजार कोटीं रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. कृषी उत्पन्न बाजार समिती सिंदेवाही येथे पार पडलेल्या निवडणुकीत एक हाती सत्ता दिल्याने आता शेतकऱ्यांच्या धान उत्पादनाला साठवणुकीसाठी दोन साठवणूक गोडाऊन लवकरच बांधण्यात येतील तसेच शेतकऱ्यांच्या पाल्यांच्या विवाह सोहळ्यासाठी अल्प दरात सभागृह उपलब्ध करून देत याकरिता स्थानिक विकास निधी अंतर्गत 25 लक्ष रुपयाचे सभागृह निर्माण करण्यात येईल, अशी घोषणा देखील यावेळी त्यांनी केली. यातून बाजार समितीचे उत्पन्न वाढून शेतकऱ्यांची आर्थिक बचत देखील होईल. सोबतच शेतकऱ्यांना विविध कल्याणकारी योजना मार्फत शेत मालाला हमीभाव मिळवून देण्यासाठी व बदलती पिक पद्धती यावर विशेष मार्गदर्शन मेळावे घेण्यात येईल, असेही माजी मंत्री वडेट्टीवार यांनी आपल्या भाषणातून सांगितले. 


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंगेश मेश्राम, प्रास्ताविक सभापती रमाकांत लोधे यांनी केले. यावेळी परिसरातील बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.





  Print






News - Chandrapur




Related Photos