महत्वाच्या बातम्या

 आष्टी येथे शासन आपल्या दारी शिबिरास लाभार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग


-  आ.दादाराव केचे यांच्याहस्ते शिबिराचे उद्घाटन
-  लाभार्थ्यांना विविध विभागाच्या योजनांचा लाभ
- ट्रॅक्टर, झेरॅाक्स, शिलाई मशीन, सायकलचे वाटप


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : आष्टी येथे तालुकास्तरीय शासन आपल्या दारी व अहिल्याबाई होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराचे उद्घाटन आ.दादाराव केचे यांच्याहस्ते झाले. शिबिरास लाभार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी शासन विविध प्रकारच्या योजना राबविते. या योजनांचा लाभ घेतला पाहिजे, असे यावेळी आ.केचे यांनी सांगितले.
पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित या कार्यक्रमाला आमदार केचे यांच्यासह उपविभागीय अधिकारी हरीश धार्मिक, तहसिलदार सचिन कुमावत, गट विकास अधिकारी प्रदिप चव्हाण, बाल विकास प्रकल्प अधिकारी श्रीमती टेकरवाडे, तालुका कृषी अधिकारी दिगंबर साळे, संजय गांधी समितीचे अध्यक्ष कमलाकर निंभोरकर उपस्थित होते.
या शिबिरात महसूल, पंचायत समिती, बालविकास प्रकल्प, कृषी विभाग, आरोग्य विभाग, वनविभाग, पशुसंवर्धन, भारतीय स्टेट बँक, बँक ऑफ इंडिया, महिला आर्थिक विकास महामंडळ इत्यादी विभागांचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. विभागांनी आपआपले स्टॅाल लावले होते. लाभार्थ्यांना योजनांचा लाभ देण्यासोबतच योजनांची माहिती दिली.
यावेळी महसूल विभागाच्यावतीने दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेंतर्गत मंजूर 18 लाभार्थ्यांना शेतजमिनीच्या सातबाराचे वाटप करण्यात आले. संजय गांधी योजना अंतर्गत एकूण 98 लाभार्थ्यांना मंजुरी आदेश वाटप करण्यात आले. एकूण 24 लाभार्थ्यांचे रेशनकार्ड संदर्भात काम करण्यात आले. कलम 85 अंतर्गत एकूण 12 लाभार्थ्यांना सातबारा वाटप करण्यात आले व लेव्ही पुनर्वसन वाटप अनुषंगाने वर्ग दोनचे वर्ग एक सातबारा 3 लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले. निवडणूक विभागाच्यावतीने 14 लाभार्थ्यांना मतदार यादीत नाव समाविष्ट व वगळणी विषयक काम करण्यात आले.
पंचायत समितीच्यावतीने 43 लाभार्थ्यांना सायकल वाटप, 32 लाभार्थ्यांना शिलाई मशीन वाटप आणि 3 दिव्यांग लाभार्थ्यांना झेरॉक्स मशीन वाटप करण्यात आले. प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांना देखील विविध टप्प्यांवरचे हप्ते वाटप करण्यात आले. एकात्मिक महिला व बालविकास प्रकल्पाच्यावतीने 360 महिला कार्यक्रमास उपस्थित होत्या. महिलांकडून 203 समस्या अर्ज प्राप्त झाले. यापैकी 186 महिला लाभार्थ्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यात आले.
कृषी विभागामार्फत 53 शेतकऱ्यांना विविध योजनेची माहिती देण्यात आली व 3 लाभार्थ्यांना ट्रॅक्टरचे वाटप करण्यात आले. आरोग्य विभागामार्फत 60 लाभार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. बँक ऑफ इंडिया आणि भारतीय स्टेट बँकेच्यावतीने 15 लाभार्थ्यांना पीक कर्ज व मुद्रा लोनबाबत माहिती देण्यात आली. पशुसंवर्धन विभागामार्फत 8 लाभार्थ्यांना तर महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत 9 लाभार्थ्यांना माहिती देण्यात आली.
या शिबिराच्या आयोजनासाठी नायब तहसिलदार दिपक काळुसे, चंद्रशेखर वानखडे तसेच बाल विकास प्रकल्पाचे ठाकरे यांनी परिश्रम घेतले. शिबिरास सर्व मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सेवक, अंगणवाडी सेविका व इतर विविध विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.





  Print






News - Wardha




Related Photos