पुलवामा येथे दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक , दोन जवान शहीद


वृत्तसंस्था / श्रीनगर :  जम्मू- काश्मीरमधील पुलवामा येथे दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली असून या चकमकीत दोन जवान शहीद झाल्याचे वृत्त आहे. तर एका दहशतवाद्याचा या चकमकीत खात्मा करण्यात आला आहे.
पुलवामा येथील रत्नीपोरा येथे दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. यानुसार मंगळवारी पहाटे तीनच्या सुमारास सुरक्षा दलांनी गावात शोधमोहीमेला सुरुवात केली. या दरम्यान झालेल्या चकमकीत तीन जवान जखमी झाले. त्यांना तातडीने स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. यातील दोन जवानांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर एकावर उपचार सुरु असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे समजते.
या चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा देखील करण्यात आला आहे. हिज्बुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेच्या हिलाल अहमद या दहशतवाद्याला चकमकीत कंठस्नान घातल्याची माहिती सुरक्षा दलांनी दिली. तो पुलवामा येथील रहिवासी होता. या चकमकीदरम्यान स्थानिकांनी सुरक्षा दलांच्या कारवाईला विरोध दर्शवल्याचे समजते. 



  Print






News - World | Posted : 2019-02-12






Related Photos