आरोपीचे पोलीस ठाण्यातून पलायन , लोहमार्ग पोलीस ठाण्यातील दोन कर्मचारी निलंबित


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी /  नागपूर :
गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असताना आरोपी  पोलीस ठाण्यातून फरार  झाल्यामुळे काम करताना बेजबाबदारपणाचा आरोप ठेवून लोहमार्ग पोलीस ठाण्यातील दोन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. लोहमार्ग पोलीस अधीक्षक अमोघ गावकर यांनी सोमवारी हा आदेश काढला असून, आदेशानुसार दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केल्याची नोटीस बजावण्यात आली आहे.
भोजराज प्रधान आणि नितीन मानकर अशी निलंबित करण्यात आलेल्या शिपायांची नावे आहेत. राजीव दुबे (३९) रा. मुंबई तसेच मूळ नागपूरच्या रमीक सोसायटी, उत्थाननगर, गोरेवाडा रिंगरोड येथील रहिवासी आहे.त्याने मुंबई-नागपूर सेवाग्राम एक्स्प्रेसमध्ये प्रवासादरम्यान एका अल्पवयीन मुलीची छेड काढली. त्यासाठी लोहमार्ग पोलिसांनी त्याच्याविरुद्ध पोक्सोनुसार गुन्हा दाखल करून शेगाव रेल्वे पोलिसांकडे गुन्हा वर्ग केला आहे. ही घटना शनिवारी घडली. शनिवारी सकाळी आरोपी दुबेला लोहमार्ग पोलीस ठाण्यात आणल्यानंतर पोलिसांनी चौकशी करून त्याचे बयान घेतले. त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असताना आरोपी दुबे ठाण्यातून फरार होण्यात यशस्वी झाला. प्रधान आणि मानकर यांना निलंबनाची नोटीस मिळताच, पुढील कारवाई कुणावर होणार, याबाबत मुख्यालय आणि लोहमार्ग पोलीस ठाण्यात चर्चा सुरू आहे. या   प्रकरणात पोलीस अधीक्षक अमोघ गावकर यांनी ठाण्यातील तत्कालीन प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक संदीप गोंडाणे यांची तात्काळ प्रभावाने नियंत्रण कक्षात बदली केली आहे. 



  Print






News - Nagpur | Posted : 2019-02-12






Related Photos