महत्वाच्या बातम्या

 कारंजा येथे शासन आपल्या दारी कार्यक्रमात १ हजार २५८ लाभार्थ्यांना लाभ


- आ. दादाराव केचे यांच्याहस्ते शिबिराचे उद्घाटन

- लाभार्थ्यांची शिबिरास मोठ्या संख्येने उपस्थिती

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : सर्वसामान्य नागरिकांना एकाच ठिकाणी विविध प्रकारच्या शासकीय सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी शासनाच्यावतीने संपूर्ण राज्यभर शासन आपल्या दारी हे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत कारंजा येथे आयोजित शिबिरात एकाच दिवशी १ हजार २५८ लाभार्थ्याना लाभ देण्यात आला. शिबिराचे उद्घाटन आ. दादाराव केचे यांच्या हस्ते झाले.

कार्यक्रमाला उपविभागीय अधिकारी हरीष धार्मिक, तहसिलदार ऐश्वर्या गिरी, गटविकास अधिकारी प्रविण देशमुख, नायब तहसिलदार के.पी. साळवे, विस्तार अधिकारी कैलास वानखेडे, कारंजा नगर पंचायतचे मुख्याधिकारी मनोजकुमार शहा यांच्यासह विविध शासकीय विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. विभागांनी आपल्या कार्यालयाचे स्टॉल कार्यक्रमस्थळी लावले होते. नागरिकांना सेवा उपलब्ध करुन देण्यासोबतच विविध शासकीय योजनांची माहिती देखील यावेळी कर्मचाऱ्यांनी लाभार्थ्यांना दिली.

या शिबिरात संजय गांधी योजनेच्या ४२ लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला. २०६ लाभार्थ्यांना राशनकार्ड तर १४९ लाभार्थ्यांना सेतू प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. मनरेगाचे ९ लाभार्थी, प्रधानमंत्री आवास योजना ३ लाभार्थी, शबरी आवास योजना १०, रमाई आवास योजना ४, स्वच्छ भारत योजनेच्या १० लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला तर इतर १८ दाखल्यांचे वाटप पंचायत समितीच्यावतीने करण्यात आले.

कृषी विभागाच्यावतीने यांत्रिक अवजारे, ट्रॅक्टर, ठिंबक/तुषार सिंचनचा, फळबाग लागवड १८९ लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला तर महिला व बाल विकास विभागाच्यावतीने माझी कन्या भाग्यश्री योजनेंतर्गत २८ लाभार्थ्यांना मुदत ठेवीचे वाटप करण्यात आले. पूर्व शालेय शिक्षण किट १३४, स्टार प्रोजेक्ट कीटचा ७ लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला. भूमी अभिलेख विभागाच्यावतीने ७ लाभार्थ्यांना मोजणीची क प्रत तर १ लाभार्थ्यांला सनदचे वाटप करण्यात आले.

आरोग्य विभागाच्यावतीने १७ लाभार्थ्यांना आयुष्यमान भारत गोल्डन कार्डचे वाटप करण्यात आले. ९० रुग्णांची तपासणी, २० रुग्णांची रक्तगट तपासणी, ७० रुग्णांची रक्त तपासणी, १०२ रुग्णांची आरोग्य तपासणी, ८० रुग्णांची बीपी व शुगर तपासणी तर ३० कुष्ठरोग व क्षयरोगाची तपासणी करण्यात आली. वन विभागाच्यावतीने ५ लाभार्थ्यांना शेत नुकसानीचे धनादेश, ५ लाभार्थ्यांना पशुधन नुकसानीच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले. 

भारतीय स्टेट बँकेच्यावतीने ५ लाभार्थ्यांना बचतगट मुद्रा योजनेचा लाभ देण्यात आला. नगर पंचायतीच्यावतीने ४ लाभार्थ्यांना  जन्म व मुत्यू प्रमणपत्राचे वितरण करण्यात आले तसेच प्रधानमंत्री आवास योजनेच्या १० लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला तर विज कंपनीच्यावतीने लाभार्थ्यांना वीज जोडणी देण्यात आली. शिबिरास संपूर्ण तालुक्यातील लाभार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.





  Print






News - Wardha




Related Photos