महत्वाच्या बातम्या

 शेतकऱ्यांनी बीबीएफचा वापर करत कमी खर्चात जास्त उत्पन्न घ्यावे : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले


- बीबीएफ देखभाल व दुरुस्ती प्रशिक्षण

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : शेतकरी वापरत असलेल्या पारंपरिक पद्धतीमध्ये बदल करणे गरजेचे आहे. नाविन्यपूर्ण योजने अंतर्गत रुंद वरंबा व सरी म्हणजेच बीबीएफ तंत्रज्ञानाचा समावेश करण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी या तंत्रज्ञानाचा वापर करत कमी खर्चात अधिक उत्पन्न घ्यावे, असे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सांगितले.

कृषि विज्ञान केंद्र, सेलसुरा येथे कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व कृषि विज्ञान केंद्राच्या संयुक्त विद्यमाने कौशल्य आधारित प्रशिक्षण बीबीएफ देखभाल व दुरुस्ती प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी प्रभाकर शिवणकर, महिंद्रा कंपनीचे प्रबंधक डॉ. गौरव वैद्य, वरिष्ठ शास्त्रज्ञ व कृषि विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. जीवन कतोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

इतर पिकांसोबत चिया या तृणधान्य पिकाचा देखील समावेश शेतीमध्ये करावा. जिल्ह्यामध्ये रेशीम उत्पादन चांगल्या प्रकारे होत आहे. यासाठी शेतकऱ्यांनी तुती लागवड करुन रेशीम उद्योग उभारणीवर भर द्यावा. असेही  राहुल कर्डिले म्हणाले. बीबीएफ पेरणी यंत्र हे ट्रॅक्टर चलित पेरणी यंत्र आहे. रुंद वरंबे व सऱ्या पाडणे, पेरणी आणि खते देणे अशी तिन्ही कामे एकाच वेळी केली जाऊ शकतात. कृषि विभागाद्वारे बीबीएफ यंत्राकरीता अनुदान मिळणार असून जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याला कृषि विज्ञान केंद्र, सेलसुराच्यावतीने बीबीएफ तंत्रज्ञान या विषयी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे त्याचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे प्रतिपादन प्रभाकर शिवणकर यांनी केले.

शेती प्रगत करण्यासाठी रुंद वरंबा व सरी यंत्र व त्याद्वारे पेरणी महत्वाची ठरू शकते. बदलत्या वातावरणामुळे पाण्याची कमतरता होऊन उत्पादनामध्ये घट होऊ शकते. यावर उपाय म्हणून बीबीएफचा वापर करावा. तसेच जास्त पाणी जमिनीत मुरावे व अतिरिक्त पाण्याचा निचरा होणे याकरिता बीबीएफ तंत्रज्ञान फायदेशीर ठरते, अशी माहिती डॉ. जीवन कतोरे यांनी प्रास्ताविक करताना दिली.

तांत्रिक सत्रादरम्यान कृषिविद्या विषयतज्ञ डॉ. रुपेश झाडोदे यांनी बीबीएफ यंत्राद्वारे पेरणी पद्धती व त्याचे फायदे सांगून प्रक्षेत्रावर बीबीएफ यंत्राचे प्रात्यक्षिक करून दाखविले. बीबीएफद्वारे पेरणीपूर्वी माती परीक्षण करणे किती आवश्यक आहे याबद्दल माती परीक्षण प्रयोगशाळा तंत्रज्ञ गजानन म्हसाळ यांनी माहिती दिली.

यादरम्यान पूर्वीपासून बीबीएफ यंत्राचा वापर करणारे कृविके दत्तक गाव खापरी, सेलू येथील शेतकरी सुरेश गव्हाळे, महिला शेतकरी प्रिती चौधरी, वैशाली पुरी, भीमराव खोडे  यांनी त्यांचे अनुभव कथन केले.

याप्रसंगी धानोरा येथील उल्हास जैन यांनी चिया सिड या पिकाची पेरणी ते विक्री व्यवस्थापन याबद्दल विस्तृत माहिती शेतकऱ्यांना दिली. यादरम्यान शेतकरी तसेच कृषि व संलग्न विभागातील अधिकारी, कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे संचलन विस्तार शिक्षण विषयतज्ञ डॉ.अंकिता अंगाईतकर यांनी केले तर उपस्थितांचे आभार पशु संवर्धन व दुग्धशास्त्र विषयतज्ञ डॉ. सचिन मुळे यांनी केले.

कार्यकमाकरिता डॉ. निलेश वझीरे, डॉ. प्रेरणा धुमाळ, पायल उजाडे, किशोर सोळंके, वैशाली सावके, समीर शेख, दिनेश चराटे, गजेंद्र मानकर, वसीम खान यांनी योगदन दिले.





  Print






News - Wardha




Related Photos