महत्वाच्या बातम्या

 वैरण उत्पादनासाठी शंभर टक्के अनुदानाचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / भंडारा : पशुसंवर्धन विभागामार्फत राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत वैरण व खाद्य अभियान राबविण्यात येते. या अभियानांतर्गत वनक्षेत्र नसलेल्या नापिकी जमिनी, गायरान जमिनी, गवती कुरणक्षेण व पडीत जमीन क्षेत्रातून शेतकऱ्यांना वैरण उत्पादन करण्यासाठी १०० टक्के अनुदानावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांकडून वैरण उत्पादन करण्यासाठी हलक्या प्रतीच्या जमिनीची धूप थांबविण्यासाठी त्यावर योग्य प्रकारे एकदल, द्विदल गवताची लागवड करून वैरणाचे उत्पादन घेणे या योजनेसाठी पशुसंवर्धन विभागामार्फत दरवर्षी अर्ज मागविण्यात येतात. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना १०० टक्के अनुदान दिले जाते.

या अनुदानामध्ये केंद्र शासन ६० टक्के व राज्य शासनाचा ४० टक्के रकमेचा हिस्सा आहे. जेथे मृदोपचाराची आवश्यकता आहे, अशा सार्वजनिक जमिनीसाठी प्रती हेक्टर १ लाख रुपये, मृदा उपचाराची आवश्यकता नाही अशा सार्वजनिक जमिनीसाठी ८५ हजार रुपये, शासकीय जमिनी व गौशाळासाठी ६५ हजार रुपये, दूरक्षेत्रातील गवती कुरण जमिनीसाठी ५० हजार रुपये व वैयक्तिक शेतकऱ्यांसाठी ३० हजार रुपये इतकी अनुदानाची कमाल मर्यादा ठेवण्यात आली आहे. यासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी ३० जून पर्यंत अर्ज सादर करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी संबंधित पंचायत समितीच्या पशुधन विकास अधिकारी (वि) यांच्या कडे अर्ज सादर करावा, असे जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त कार्यालय भंडारा कडून कळविण्यात आले आहे.





  Print






News - Bhandara




Related Photos