लष्कर-ए-तय्यबाचा दहशतवादी मोहम्मद हनिफ याचा नागपूर येथील मध्यवर्ती कारागृहात मृत्यू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी /  नागपूर :
  नऊ वर्षांपूर्वी मृत्युदंड ठोठावण्यात आलेला गुजरात रिव्हेंज फोर्सचा प्रमुख तसेच लष्कर-ए-तय्यबाचा दहशतवादी मोहम्मद हनिफ अब्दुल रहिम (५६) याचा शनिवारी रात्री येथील मध्यवर्ती कारागृहात मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूने २५ ऑगस्ट २००३ मध्ये झालेल्या गेट वे ऑफ इंडिया तसेच झवेरी बाजारातील भयावह बॉम्बस्फोटाच्या थरारक आठवणी पुन्हा एकदा ताज्या झाल्या आहेत. 
गुजरातमध्ये घडलेल्या काही घटनांचा सूड निरपराध नागरिकांवर उगविण्यासाठी २००३ मध्ये हनिफने पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या चिथावणीवरून गुजरात रिव्हेंज फोर्स नामक ग्रूप तयार केला होता. मुंबईत बॉम्बस्फोट घडवून देशातच नव्हे तर विदेशातही दहशत पसरवायची, असा कट गुजरात रिव्हेंज फोर्स संचलित करणाऱ्या हनिफ आणि फहमिदा या दाम्पत्याने रचला होता. त्यासाठी हनिफ आणि त्याच्या पत्नीने नासिर आणि अशरत या दोघांची मदत घेतली होती. त्यासाठी त्यांनी पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या मदतीने जिलेटिन तसेच डिटोनेटरच्या माध्यमातून शक्तिशाली बॉम्ब कसे बनवायचे, त्याचे प्रशिक्षण लष्करच्या दहशतवाद्यांकडून घेतले होते. सर्व तयारी केल्यानंतर २४ ऑगस्ट ला फहमिदा, हनिफ आणि अशरतने बॉम्बस्फोट घडविण्यासाठी दिवसभर मुंबईतील विविध जागांची पाहणी केली होती. २५ ऑगस्ट रोजी कुणाला शंका येऊ नये म्हणून फहमिदा तसेच हनिफने आपल्या मुलींना सोबत घेऊन घर सोडले होते. हनिफने शिव पांडे नामक चालकाची कॅब (टॅक्सी) केली होती तर अशरतने लाला सिंहची कॅब १ हजार रुपयात भाड्याने घेतली होती. हनीफ पांडेची कॅब घेऊन गेट वे ऑफ इंडियाला पोहचला तर अशरत लाला सिंगची टॅक्सी घेऊन झवेरी बाजारात पोहचला. या दोघांजवळ शक्तिशाली बॉम्ब होते आणि त्यांनी स्फोटाची वेळही टायमरमध्ये फिक्स केली होती. १२. ४० वाजता झवेरी बाजारात टॅक्सी पार्क करून अशरत टॅक्सी बाहेर पडला. तर, हनिफने पांडेला ताजमहल हॉटेलसमोर टॅक्सी पार्क करण्याची सूचना करून फहमिदा तसेच दोन मुलीसह बाहेर निघाला. झवेरीत झालेल्या भयावह स्फोटात ३६ लोकांचा मृत्यू झाला होता आणि १३८ जण गंभीर जखमी झाले होते. या स्फोटाने परिसरातील कोट्यवधींचे नुकसान केले होते तर, गेट वे जवळ घडवून आणलेल्या स्फोटात १६ जणांचा मृत्यू तर ३६ लोकांना गंभीर दुखापत झाली होती.  Print


News - Nagpur | Posted : 2019-02-11


Related Photos