महत्वाच्या बातम्या

 संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळामार्फत व्यवसायासाठी अनुदान योजना


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळामार्फत व्यवसायासाठी 50 टक्के अनुदान योजना तसेच बीज भांडवल योजना राबविली जाते. महामंडळाच्या गडचिरोली जिल्हा कार्यालयास सन 2023-24 या आर्थिक वर्षांसाठी 50 टक्के अनुदान योजनेअंतर्गत 4 लाभार्थी व बीज भांडवल योजनेअंतर्गत 6 लाभार्थ्यांचे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे. या योजनांचा लाभ घेण्यासाठी विहित नमुन्यातील प्रस्ताव एक महिन्यात महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात सादर करावा. जिल्ह्यातील चांभार, ढोर, मोची व होलार समाजातील बेरोजगार युवक, युवतीं तसेच होतकरू गरजू अर्जदारांनी योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक राजेंद्र टी.जिभकाटे यांनी केले आहे. 


महामंडळाच्या 50 टक्के अनुदान योजनेतून राष्ट्रीयकृत बॅकेमार्फत 50 हजार रूपयेपर्यंत गुंतवणूक असणाऱ्या व्यवसायासाठी सवलतीच्या व्याजदराने अर्थसहाय्य दिले जाते. या अर्थसहाय्यापैकी 10 हजार रूपये महामंडळ अनुदान म्हणून देते. 50 हजार ते 5 लाख रूपये पर्यंत प्रकल्प गुंतवणूक असणाऱ्या कोणत्याही व्यवसायासाठी बीज भांडवल योजनेअंतर्गत राष्ट्रीयकृत बँकेमार्फत कर्ज पुरवठा सवलतीच्या व्याजदराने उपलब्ध करण्यात येतो. या योजनेअंतर्गत बॅकेने मंजुर केलेल्या कर्ज रक्कमे पैकी 75 टक्के रक्कम ही राष्ट्रीयकृत बँकेमार्फत देण्यात येते. 5 टक्के रक्कम लाभार्थ्यांने स्वतःचा सहभाग म्हणून बँकेकडे जमा करायची असते. उर्वरीत 20 टक्के रक्कम महामंडळ बीज कर्ज म्हणून देते. त्या रक्कमे पैकी 10 हजार रूपये अनुदान म्हणून देण्यात येते. 


या दोन योजना राष्ट्रीयकृत बॅकेमार्फत राबविल्या जात असून या योजनांसाठी चांभार, समाजात अंतर्भाव असणाऱ्या चांभार ढोर, मोची व होलार या समाजातील अर्जदारांकडून विविध व्यवसायासाठी कर्ज प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. या समाजातील लाभ घेऊ इच्छिणाऱ्या अर्जदारांनी यापूर्वी महामंडळाच्या कोणत्याही योजनाचा लाभ घेतलेला नसावा. तसेच अर्जदारांने महामंडळाच्या नियमाप्रमाणे आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करून कर्ज प्रस्ताव तीन प्रतीत महामंडळाचे जिल्हा कार्यालय, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, आय.टी.आय.च्या पाठीमागे एल.आय.सी.रोड, गडचिरोली येथे सादर करावेत. मूळ कागदपत्रांसह स्वत: अर्जदारांने उपस्थित राहून दाखल करावेत. त्रयस्थ किंवा मध्यस्थामार्फत कर्ज प्रकरणे स्विकारण्यात येणार नाहीत.
प्रस्तावासोबत जोडावी लागणारी कागदपत्रे: सक्षम अधिकाऱ्यांनी दिलेला जातीचा दाखला, तहसीलदार यांच्याकडून घेतलेला अर्जदाराच्या कुटुंबाचा चालू वर्षांचा उत्पन्नाचा दाखला, नुकतेच काढलेले छायाचित्र तीन प्रतीत, अर्जदाराचा शैक्षणिक दाखला, रेशन कार्ड झेरॉक्स प्रत, आधारकार्ड किंवा मतदानकार्ड किंवा पॅनकार्डची झेरॉक्सप्रत, व्यवसायाचे दरपत्रक, व्यवसाय ज्या ठिकाणी करावयाचा आहे त्या जागेची भाडेपावती, करारपत्रक किंवा मालकी हक्काचा पुरावा, लाईट बील, टॅक्स पावती, बीज भांडवल योजनेसाठी प्रकल्प अहवाल, वाहनासाठी लायसन्स परवाना बॅच, व्यवसायाचे ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका यांचे नाहरकत प्रमाणपत्र, व्यवसायासंबंधी तांत्रिक प्रमाणपत्र तसचे अनुभवाचा दाखला, अनुदान न घेतल्याबाबत प्रतिज्ञापत्र इत्यादी कागदपत्रे स्वयंसाक्षांकीत करून घोषणापत्र प्रस्तावासोबत जोडणे आवश्यक आहे. असे जिल्हा व्यवस्थापक संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ (म.), गडचिरोली यांनी कळविले आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos