तीन रानडुकरांचा विहिरीत पडून मृत्यू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / वाशीम : 
पाण्यासाठी भटकत असलेल्या तीन रानडुकरांचा विहिरीत पडून मृत्यू झाला. ही घटना वाशीम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यातील वनोजा शिवारात सोमवार ११ फेब्रुवारी रोजी घडली. 
वनोजा शिवारात हरीण, रानडुक्कर, निलगाय आदि वन्यप्राणी मोठ्या संख्येने तहान भागविण्यासाठी वनोजा शिवारात फिरत आहेत. अशातच सोमवारी या शिवारातील वासुदेव राऊत यांच्या शेतातील विहिरीत तीन रानडुकरे पडली असल्याचे त्यांना दिसले. त्यांनी ही माहिती वाईल्ड लाईफ कंझर्वेशन टीम मंगरूळपीर शाखा वनोजाचे सदस्य आदित्य इंगोले यांना दिली. त्यावरून आदित्य इंगोले आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळ गाठले. परंतु तिन्ही रानडुकरांचा पाण्यात बुडुन मृत्यू झाल्याचे त्यांना दिसले. 
सदर घटनेची माहिती कारंजा-मंगरूळपीर वनपरिक्षेत्र अधिकारी देवानंद डोंगरे, तसेच मानद वन्यजीव रक्षक गौरव कुमार इंगळे यांना देण्यात आली. त्यानंतर वनविभागाचे कर्मचारी डाखोरे व वाईल्ड लाईफ कंझर्वेशन टीमच्या सदस्यांनी तिन्ही मृत रानडुकरांना विहितीबाहेर काढले. वनविभागाने पचंनामा करून तिन्ही मृत रानडुकरांना रितसर दफन केले.

 



  Print






News - Rajy | Posted : 2019-02-11






Related Photos