रापमच्या बसेसची बांधणी इतकी कमकुवत का?


- अपघातांमध्ये होतोय चुराडा
- प्रवाशांसाठी ठरत आहे धोकादायक
- जिल्ह्यातील रस्त्यांवर धावणाऱ्या असंख्य बसेस भंगार
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ असे ब्रिदवाक्य धारण करून खेड्यापाड्यात सेवा देणारी ‘लालपरी‘ म्हणजे राज्य परिवहन महामंडळाची बस. मात्र महाराष्ट्राची शान असलेली ही लालपरी अपघांतांमध्ये चुराडा होण्याचे कारण म्हणजे कमकुवत बांधणीच असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात धावत असलेल्या बसेस ह्या भंगार अवस्थेतील असून इतर जिल्ह्यांमध्ये धावून आपली क्षमता नष्ट केलेल्या असल्याने व जिल्ह्यातील रस्त्यांची अवस्था पाहता त्यांची अवस्था लवकरच खराब होत असल्यामुळे प्रवाशांच्या जीवाशी खेळ केला जात असल्याचे प्रवाशांमधून बोलल्या जात आहे. 
राज्यात अनेकदा राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसचे अपघात झाले आहेत. यामध्ये बसेसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक अपघांमध्ये अख्खी बसच चुराडा होवून जाते. पहायला गेल्यास खासगी बसेसच्या बाबतीत असे होत नाही. आजकाल प्रवासी एसटीच्या प्रवासाकडे मोठ्या प्रमाणात वळत असताना एसटीच्या अशा भंगार सेवेमुळे नाराजीचा सूर काढताना दिसून येत आहे. गडचिरोली जिल्ह्यात मागील १६ जानेवारी रोजी बस आणि ट्रकचा अपघात झाला होता. यामध्ये अर्धी बसच चिरडल्या गेली होती. तसेच काल १०  फेब्रुवारी रोजीसुध्दा सिरोंचा - अहेरी मार्गावर बस आणि ट्रकचा अपघात झाला. यामध्येसुध्दा बसचा चुराडा झाला. सुदैवाने या अपघातात एकच प्रवासी जखमी झाला. मात्र हिच बस प्रवाशांनी पूर्णपणे भरलेली असती तर मोठा अनर्थ घडला असता. 
राज्यात मानव विकास मिशनच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी बसेस पुरविण्यात आल्या आहेत. या बसेसची बांधणीसुध्दा योग्य नसल्याचे दिसून येत आहे. यामुळे विद्यार्थ्यांची सुरक्षा वाऱ्यावर असल्याचे दिसून येते. बस बांधणीसाठी वापरण्यात येणारी पत्रे कमकुवत का वापरली जातात, हासुध्दा प्रश्न आहे. जिल्ह्यातील रस्त्यांवरून बसमधून प्रवास करताना बसेसचा मोठ्या प्रमाणात आवाज येतो. यामुळे आजारी व वृध्द प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. राज्यातील विविध आगारांमध्ये वापरल्यानंतर कालबाह्य बसेस जिल्ह्याच्या माथी मारल्या जात आहेत. अनेकदा या बसेस मध्येच बंद पडतात. अनेकदा प्रवाशांनाच बसेस धक्का मारून सुरू कराव्या लागतात. पावसाळ्याच्या दिवसात बस ला गळतीच लागते.
जिल्ह्यात बसेसच्या विचित्र अपघाताच्या घटना घडल्या आहेत. एकदा अहेरी येथून येत असलेल्या एका चालत्या बसच्या डिझेलची टाकीच रस्त्यावर कोसळली होती. यावेळीसुध्दा मोठा अनर्थ टळला होता. नुकतेच गडचिरोली आगारात एक उभी असलेली बस जळून खाक झाली. यामुळे बसची योग्य देखभाल केली जात नसावी, अशीही शंका उपस्थित होत आहे. यामुळे महामंडळाने योग्य ती खबरदारी घेवून प्रवाशांच्या सेवेसाठी सुरळीत सेवा पुरवावी, अशी मागणी होत आहे.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-02-11


Related Photos