राज्यभरात थंडीची लाट : शेत पिकांना फटका


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / मुंबई :
उत्तर भारतातून येणाऱ्या अतिथंड वाऱ्यांमुळे राज्याच्या बहुतांश भागांत सध्या थंडीची लाट आली आहे. उत्तरेकडील राज्यातील थंडीची स्थिती लक्षात घेता महाराष्ट्रात पुढील आठवडाभर गारठा राहण्याचे संकेत असून, काही भागांत थंडीची तीव्रता वाढू शकते. असे हवामान विभागाकडून सांगण्यात आले. यामुळे काही शेतपिकांना फायदा होणार आहे तर काही पिकांना याचा फटका सहन करावा लागणार आहे . 
 ९ फेब्रुवारी रोजी राज्यातील किमान तापमानाच्या पाऱ्यात लक्षणीय घट नोंदविली गेली. नाशिक, पुणे आदी ठिकाणी हंगामातील नीचांकी तापमानाची नोंद झाली. रविवारीही राज्यातील किमान तापमानाचा पारा घसरलेलाच होता. पुढील आठवडाभर राज्याच्या वातावरणातील हवेचा दाब वाढणार आहे. त्यामुळे किमान तापमानात घट होऊन थंडी वाढणार आहे. नाशिक, धुळे, जळगाव, पुणे, सातारा, नगर येथे गारठा राहणार आहे. या भागातील किमान तापमान आठवडाभर ९ ते १३ अंश सेल्सिअसपर्यंत राहणार आहे. कोकण, मराठवाडा, विदर्भातही थंडीची तीव्रता कायम राहणार आहे.
थंडीच्या लाटेमुळे अनेक ठिकाणी दवबिंदू गोठून हिमकण तयार होत असल्याने त्याचा फटका द्राक्ष, किलगड, टोमॅटो आणि पालेभाज्यांना बसतो आहे. साठवलेल्या सुक्या चाऱ्यावर हिमकण जमा झाल्याने चाऱ्याला बुरशीचा प्रादुर्भाव होण्याचा धोका आहे. गहू, ज्वारी, कांदा, हरभरा या पिकांना मात्र थंडीचा फायदा होतो.

किमान तापमान (अंश सेल्सिअस)

मुंबई (कुलाबा) १६.८, सांताक्रुझ १२.४, अलिबाग १३.६, रत्नागिरी १४.८, पुणे ६.२, नगर ४.९, नाशिक ५.०, जळगाव ७.४, कोल्हापूर १५.१, महाबळेश्वर १२.२, मालेगाव ६.२, सांगली १०.४, सातारा ९.४, सोलापूर १३.०, औरंगाबाद ६.४, परभणी ८.५, नांदेड १०.५, बीड ८.५, अकोला ८.५, अमरावती १०.४, बुलडाणा ९.३, ब्रम्हपुरी ७.९, चंद्रपूर आणि गोंदिया प्रत्येकी १२.२, नागपूर ६.३, वर्धा १०, यवतमाळ ११.०  Print


News - Rajy | Posted : 2019-02-11


Related Photos