महत्वाच्या बातम्या

 अपघाती मृत्यू टाळण्यासाठी हेल्मेट अनिवार्यच : आमदार धर्मराव बाबा आत्राम


- आलापल्ली येथे हेल्मेट वाटप कार्यक्रम संपन्न

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / अहेरी : हेल्मेटचा वापर न केल्यामुळे अनेकदा दुचाकीस्वार नागरिकांचा मृत्यू होतो. यामुळे हेल्मेट सक्तीसाठी जनजागृती देखील केली जात आहे. मात्र, तरीही नागरिकांकडून हेल्मेट वापरले जात नाही. मोटार वाहन कायद्यानुसार प्रत्येक व्यक्तीने दुचाकीवरून प्रवास करताना हेल्मेट परिधान करणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे अपघाती मृत्यू टाळण्यासाठी हेल्मेट अनिवार्यच असल्याचे प्रतिपादन अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी केले.

आलापल्ली येथील वीर बाबुराव चौकात लॉयड मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड कंपनीकडून सुरक्षा सप्ताह निमित्य गुरुवारी १ जून रोजी भव्य मोफत हेल्मेट वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सेवानिवृत्त डिजीपी (गुजरात) एस.एस. खंडालवाल, विशेष अतिथी म्हणून युवा क्रिकेटर जितेश शर्मा, तिने अभिनेत्री नक्षत्रा मेढेकर,तर प्रमुख पाहुणे म्हणून आरटीओ मेश्राम, अतुल खाडिलकर, सिनेट सदस्य तनुश्री आत्राम, माजी प.स. सदस्य हर्षवर्धन आत्राम, सरपंच शंकर मेश्राम उपसरपंच विनोद अकनपल्लीवार आदी मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी २००४ मध्ये मी परिवहन मंत्री असताना हेल्मेट सक्ती केली होती.मात्र,पुणेकरांनी याचा विरोध केला होता. शेवटी हेल्मेट मुळे आपण किती सुरक्षित आहोत हे आता लोकांना कळायला लागला.घरचा कमावता व्यक्ती गेल्यास त्या कुटुंबाचा किती नुकसान होतो, हे त्याच कुटुंबाला कळते. त्यामुळे हेल्मेट सक्ती आवश्यक आहे.सोबतच आपल्याकडे दुचाकी,चारचाकी वाहन असेल तर चालक परवाना सुद्धा आवश्यक आहे.त्यामुळे बरेच फायदे आहेत. लॉयड मेटल्स कंपनीने स्तुत्य उपक्रम राबवून तब्बल १ हजार हेल्मेट वाटप केले. याचा मला अभिमान असून यानंतर सुद्धा कंपनीकडून दुचाकी वाहनदारकांना आरटीओ कार्यालयाच्या माध्यमातून शिबीर घेऊन परवाने देण्याचे काम करण्यात यावे अशी आशा त्यांनी बाळगली.

हेल्मेट वाटपच्या कार्यक्रमात सिने अभिनेत्री नक्षत्रा मेढेकर आणि सेवानिवृत्त डीजीपी एस एस खांडवावाला यांनीही हेल्मेट वापर केल्यास कशा प्रकारे फायदा होतो, याबाबत अधिकृत माहिती देत असतानाच युवा पिढीला योग्य मार्गदर्शन केले. तर जितेश शर्मा यांनी आम्ही क्रिकेट खेळत असताना हेल्मेट वापर यासाठी करतो की, भविष्यात आम्हाला या फिल्डवर दीर्घकाळ टिकायचं आहे. त्यामुळे तुम्हाला पण पुढे आपल्या परिवारासाठी दीर्घकाळ टिकायचा असेल तर आजच हेल्मेट वापरायला सुरुवात करा. असा महत्त्वाचा आणि मोलाचा संदेश त्यांनी दिला.

वीर बाबुराव शेडमाके चौकात आयोजित भव्य हेल्मेट कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते काही प्रमाणात हेल्मेट वाटप करण्यात आले. त्यानंतर उर्वरित हेल्मेट वाटप कार्यक्रम ग्रामपंचायत कार्यालय अल्लापल्ली येथे करण्यात आले.

जितेश शर्मा आणि नक्षत्रा मेढेकर यांना पाहण्यासाठी आलापल्लीत एकच गर्दी -

युवा क्रिकेटर जितेश शर्मा तसेच सिने अभिनेत्री नक्षत्रा मेढेकर यांचा आगमन होताच भामरागड रस्त्यावरील वनविभागाच्या विश्रामगृहात नागरिकांनी एकच गर्दी केली होती. या ठिकाणाहून वीर बाबुराव शेडमाके चौकापर्यंत आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्यासह शेकडो नागरिकांनी दुचाकी वाहनावर रॅली काढली. त्यानंतर सर्वच मान्यवर मंचावर पोहोचले. विविध मान्यवरांचा लॉयड मेटल्स कंपनीकडून स्वागत करण्यात आले. हेल्मेट वाटप कार्यक्रम आटोपताच नागरिकांनी विशेष अतिथीसोबत सेल्फी काढण्यासाठी एकच गर्दी केली होती. कार्यक्रम आटोपल्यानंतर आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्या राजवाड्यात मान्यवरांचा जेवणाचा कार्यक्रम होता या ठिकाणी सुद्धा सिने अभिनेत्री नक्षत्रा मेढेकर आणि क्रिकेटर जितेश शर्मा यांच्यासोबत फोटोसेशन साठी नागरिकांनी एकच गर्दी केली होती.





  Print






News - Gadchiroli




Related Photos