संतप्त अभियोग्यता धारक उद्या थेट पुण्याच्या शिक्षण आयुक्त कार्यालयावर देणार धडक


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / पुणे : राज्यात शिक्षक भरतीच्या प्रश्नावर संतप्त अभियोग्यता धारकांनी थेट पुण्याच्या शिक्षण आयुक्त कार्यालयावर धडक देण्याचा निर्णय घेतला आहे. उद्या १२ फेब्रुवारी रोजी शिक्षण आयुक्त कार्यालयावर बेरोजगार अभियोग्यताधारक धडक मोर्चा काढणार आहेत. या धडक मोर्चात सहभागी होण्यास महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून किमान १,००० अभियोग्यताधारक येतील, अशी माहिती या मोर्चाचे समन्वयक म्हणून काम पाहणारे अभियोग्यता उमेदवार कल्पेश ठाकरे यांनी दिली आहे.
राज्यात डी. एड आणि बी. एड झालेल्यांची संख्या खूप मोठी आहे. शिक्षक भरतीसाठी परीक्षा घेऊन १४ महिने उलटले, तरी घोषित केलेल्या २४,००० जागांची भरती होत नाही. म्हणून बेरोजगार अभियोग्यताधारकांमध्ये भयंकर संताप आहे. या संतापाचाच परिणाम हा मोर्चा असणार असल्याचे अभियोग्यताधारकांनी म्हटले आहे. शिक्षण विभागाकडून १५ जिल्ह्यांत शिक्षकभरती पहिल्या टप्प्यात जाहीर केली आहे. मात्र, आमची मागणी सर्व जिल्ह्यांतील रिक्त पदे एकाच वेळी भरावीत अशी आहे. त्यामुळे सनदशीर मार्गानेच, पण आक्रमकपणा ठेऊन आम्ही आयुक्त कार्यालयावर धडकणार आहोत, असे कल्पेश ठाकरे यांनी सांगितले.
News - Rajy | Posted : 2019-02-11