यूपीएससीमध्ये आता मुलाखत नापास झालेल्या विद्यार्थ्यांना नोकरी मिळण्याची शक्यता


वृत्तसंस्था / नवीदिल्ली :   स्पर्धा परीक्षांमध्ये  पूर्व परीक्षा, नंतर मुख्य परीक्षा आणि त्यानंतर मुलाखत देऊन यूपीएससीमध्ये अनेकजण आपलं नशिब आजमावतात. मात्र, अनेकदा मुलाखतीत निवड न झाल्यामुळे या विद्यार्थ्यांना पुन्हा पहिल्यापासून तयारी करावी लागते. पण, आता मुलाखत नापास झालेल्या विद्यार्थ्यांना नोकरी मिळण्याची शक्यता आहे. यूपीएससी बोर्डाने केंद्र सरकारकडे मुलाखतीत नापास झालेल्या विद्यार्थ्यांना इतरत्र नोकरी देण्याची शिफारस केली आहे, अशी माहिती  युपीएससीचे चेअरमन अरविंद सक्सेना यांनी एका संमेलनात दिली आहे. 
  ओडिशामध्ये राज्य लोकसेवा आयोगाच्या संमेलनात बोलताना युपीएससीचे चेअरमन अरविंद सक्सेना म्हणाले , यूपीएससीने केंद्र सरकार आणि विविध मंत्रालयांना अशा विद्यार्थ्यांनी भरती करण्याचा प्रस्ताव दिला आहे, जे नागरी सेवा आणि इतर परीक्षांच्या मुलाखत फेरीमध्ये बाद होतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी घेतलेल्या मेहनतीचं फळ तरी त्यांना मिळेल, असे आयोगाला वाटते.  एका वर्षात जवळपास ११ लाख उमेदवार विद्यार्थी यूपीएससीच्या परीक्षेला बसतात. मात्र, केवळ ६०० ते ८०० विद्यार्थ्यांची निवड करण्यात येते. या  विद्यार्थ्यांपैकी कित्येकजण जोमाने तयारी करतात, पूर्व परीक्षा पास होतात, मुख्य परीक्षाही पास होतात. मात्र, मुलाखतीनंतर काही गुणांमुळे मेरीटमध्ये मागे पडतात. त्यामुळे त्यांच्या संपूर्ण मेहनतीवर पाणी फिरलं जातं. कारण, या उमेदवारांना पुन्हा नव्याने सुरूवात करावी लागते, पुन्हा पूर्व परीक्षेपासून या स्पर्धेत उतरावे लागते. त्यामुळे मुलाखतीपर्यंत पोहोचणाऱ्या, मेरीटमध्ये काही गुणांनी आपली रँक हुकलेल्या या उमेदवारांना इतरत्र सरकारी खात्यात नोकरी देण्यात यावी, अशी शिफारस आयोगाने केंद्राकडे केली आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांचा तणाव कमी होऊन, नोकरीच्या आशा बळावतील  , असेही सक्सेना यांनी म्हटले.    Print


News - World | Posted : 2019-02-10


Related Photos