पूर्ण ताकदीने लोकसभेच्या सर्व ४८ जागा लढविणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / मुंबई :
'लोकसभेच्या गेल्या निवडणुकीत ४२ जागांवर विजय मिळाला होता. यंदा कोणत्याही परिस्थितीत त्यापेक्षा अधिक म्हणजे किमान ४३ जागांवर आम्ही विजय मिळवू,' असा दावा करतानाच पूर्ण ताकदीने सर्वच्या सर्व ४८ जागा लढविण्याचा प्रयत्न असल्याचे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी निवडणुकीचे रणशिंग फुंकले. यावेळी  बारामती लोकसभा मतदारसंघातून 'कमळा' चाच उमेदवार लढेल, असे  स्पष्ट केले. 
पुणे, शिरूर आणि बारामती मतदारसंघातील शक्तीकेंद्र प्रमुखांच्या संमेलनात फडणवीस बोलत होते. भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा, प्रदेशाध्यक्ष दानवे आदी या वेळी उपस्थित होते. फडणवीस हे भाषणासाठी उभे राहाताच कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. गेल्या निवडणुकीतील ४२ जागांच्या यंदा ४१ जागा होणार नाहीत, या दानवे यांच्या वक्तव्याचा धागा पकडून फडणवीस म्हणाले, 'गेल्या वेळी आमच्या ४२ जागा आल्या होत्या. या वेळी आम्ही कुठल्याही परिस्थितीत ४३ जागा करू. मात्र ४१ जागा येऊ देणार नाही. आमचा तर प्रयत्न असा आहे, की आम्ही पूर्ण ताकदीने ४८ जागा लढवतो आहे. 
गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेसह अन्य पक्षाची युती होती. यामध्ये युतीने ४८ पैकी ४२ जागा जिंकल्या होत्या. येत्या निवडणुकीत अद्याप युतीबाबत निर्णय झालेला नाही. मात्र युती होईल, असा विश्वास सर्व भाजप नेते व्यक्त करीत होते. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी पूर्ण ताकदीने ४८ जागा लढविण्याचे वक्तव्य केल्याने युतीबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे.    Print


News - Rajy | Posted : 2019-02-10


Related Photos