महत्वाच्या बातम्या

 जिल्ह्याचा सर्वसमावेशक विकास आराखडा तयार करा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / भंडारा : राज्याची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी जिल्ह्यांना केंद्रस्थानी ठेवून नियोजन करण्यात येणार आहे. यासाठी प्रत्येक जिल्ह्याचा विकास आराखडा तयार करण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत. त्याअनुषंगाने भंडारा जिल्ह्याचा सर्वसमावेशक विकास आराखडा तयार करण्यात येत आहे. या विकास आराखड्यामध्ये सर्व विभागांनी आपले योगदान देवून आराखडा तयार करुन सादर करावा, असे निर्देश अपर जिल्हाधिकारी सुनिल विंचनकर यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आज जिल्हा विकास आराखडा तयार करण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. प्रशांत कडू, डॉ. मनोज राय, व्ही.एन.आय.टी. नागपूरचे प्राध्यापक डॉ. समीर देशकर, उपवनसंरक्षक राहुल गवई, नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्राचे उपसंचालक पवन जेफ, जिल्हा नियोजन अधिकारी श.क. बोरकर यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. प्रशांत कडू म्हणाले, विकास आराखड्यामध्ये दूरदृष्टी ठेवून प्रत्येक विभागाने नियोजन करणे गरजेचे आहे. जिल्ह्यामध्ये तांदूळाचे मोठ्या प्रमाणावर उत्पन्न घेतल्या जाते. त्यामुळे तांदूळाचे ब्रँडींग करण्यात यावे, यासाठी विद्यापीठाचे एम.बी.ए च्या विद्यार्थ्यांना सहभागी करुन घेता येईल. जिल्ह्याच्या विकास आराखडा तयार करतांना विद्यापीठाव्दारे आवश्यक ती मदत करण्यात येईल, असे ते म्हणाले.

व्ही.एन.आय.टी नागपूरचे प्राध्यापक डॉ. समीर देशकर म्हणाले, व्ही.एन.आय.टी मार्फत विविध क्षेत्रात प्रशिक्षणाची सोय उपलब्ध आहे, त्यासाठी मदत करण्यात येईल. जिल्ह्याची सद्यस्थिती, बलस्थाने ओळखून विकास आराखड्याचे नियोजन करणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.

जिल्हा विकास आराखड्याचे नियोजन -

जिल्ह्याच्या विकासासाठी धोरणात्मक नियोजन व अंमलबजावणी आराखडा तयार करावयाचा असून त्यामध्ये कृषि व संलग्न सेवा, उद्योग, जलसंधारण, पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, पर्यटन व इतर विविध क्षेत्रांचा प्रामुख्याने समावेश असणार आहे. त्याचप्रमाणे, सदर विकास आराखडा तयार करताना विविध शाश्वत विकास ध्येये गाठण्यासाठी आवश्यक ती कार्यप्रणालीचा या आराखड्यात समावेश अंतर्भूत असणे आवश्यक आहे.

जिल्हा आराखड्यामध्ये समाविष्ट करावयाच्या बाबी -

जिल्ह्याची सद्यस्थिती, बलस्थाने, उणिवा, संधी आणि धोके याबाबत सॉट विश्लेषण, जिल्ह्याचे व्हिजन, प्रमुख भागधारकांसोबत सल्लामसलत, क्षेत्र व उपक्षेत्राची निवड व जिल्हा कृती आराखडा या पाच बाबींवर आधारित हा आराखडा असणार आहे.

आतापर्यंत भंडारा जिल्ह्यात जिल्हा विकास आराखड्यावर सातत्याने काम सुरू असून ही आराखड्या संदर्भातील सहावी बैठक आहे. या विकास आरखड्याच्या निर्मितीमध्ये सामान्य नागरिकांची मते देखील ई-मेल द्वारे प्राप्त झालेली असून त्याचा देखील समावेश आराखडा बनवितांना करण्यात येणार असल्याचे जिल्हा नियोजन अधिकारी बोरकर यांनी सांगितले. 





  Print






News - Bhandara




Related Photos