गडचिरोली जिल्ह्यातील मलेरिया नियंत्रण उपायांवर टास्क फोर्सची चर्चा


-  सर्च मध्ये मलेरिया नियंत्रण कार्यगटाची पहिली बैठक
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
जिल्ह्यातील मलेरिया नियंत्रणात आणण्यासाठी शासनाद्वारेसर्च चे संचालक डॉ अभय बंग यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या कार्यगटाची पहिली बैठक सर्च मध्ये ७ फेब्रुवारी रोजी घेण्यात आली. जिल्ह्यात मलेरिया आजार बळावण्याची कारणे शोधून त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या उद्देशानेया बैठकीत चर्चा झाली.
 बैठकीला कार्यगटाचे अध्यक्ष डॉ. अभय बंग, आरोग्य सेवा संचालनालयाचे संचालक डॉ. सतीश पवार यांच्यासह माजी आरोग्य महासंचालक डॉ. सुभाष साळुंखे,सहसंचालक डॉ. भोई, उपसंचालक डॉ. जयस्वाल, डॉ. मिलिंद गणवीर,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शशिकांत शंभरकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल रुडे, डॉ. महेंद्र जगताप,डॉ. मशाखेत्री, डॉ. धुर्वे,जिल्हा मलेरिया अधिकारी डॉ. मोडक, डॉ. नंदेश्वर आदी कार्यगटातील सदस्य उपस्थित होते.
सर्वप्रथम जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शंभरकर यांनी जिल्ह्यातील मलेरिया रोगाची सद्यस्थिती आणि केल्या जात असलेल्या शासकीय उपाययोजनांची माहिती दिली. यानंतर सर्च मध्ये आदिवासी आरोग्य विभागात कार्यरत डॉ. शुभा आस्था शर्मा यांनी सर्च ने केलेल्या ‘गडचिरोली जिल्ह्यातील मलेरिया नियंत्रणातील अडथळे’ या संशोधनाविषयी, सोबतचनिर्थ आणि सर्च संस्थेने केलेल्या संशोधना विषयी ही माहिती दिली. मच्छर नियंत्रणासाठी फवारणी करण्यात येणाऱ्या बहुतेक कीटकनाशक औषधांना प्रतिरोध करण्याची शक्ती मछरांमध्ये निर्माण होत असल्याचे यात आढळले आहे. ही काळजीची बाब आहे, असे डॉ. बंग यांनी सांगितले. सोबतच गडचिरोली जिल्ह्यातील २५ वर्षातील मलेरियाचे आदिवासी ग्रामीण भागातील वास्तवही विषद केले. मलेरियाचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी अनेक देशांमध्ये संशोधन आणि प्रयत्न सुरु आहेत. यातील यशस्वी उपाययोजनांवर चर्चा कार्यगटाने केली. डॉ. साळुंखे यांनी ओरिसामध्ये मेलेरिया निवारणार्थ केलेल्या उपयायोजना यावेळी मांडल्या.
या सर्व चर्चांमधून काही ठळक बाबी पुढे आल्या. जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये आजही आरोग्य कार्यकर्ता नाही. अशा गावांमध्ये मलेरिया उपचार देण्यासाठी ‘आशा’ सहायक सिद्ध होऊ शकते. त्यामुळे आशांना मलेरिया उपचारासाठी खास प्रशिक्षण देणे, आशा नसलेल्या गावांमध्ये खास मलेरिया नियंत्रण स्वयंसेवक नेमणे, या रोगाच्या नियंत्रणासाठी आवश्यक औषधसाठ्याचा जिल्ह्यात कधीच तुटवडा पडू न देणे आणि गावापर्यंत औषध पोहोचण्यासाठी एक यंत्रणा विकसित करणे, लोकांना मच्छरदानीचे महत्व समजावून सांगत त्या वापरण्यासाठी उद्युक्त करणे आदी उपायांवर चर्चा झाली. जिल्ह्यातील बहुसंख्य मुले ही आश्रमशाळांमध्ये शिकतात. त्यांना मेलेरियाचा प्रादुर्भाव होण्याचा धोका जास्त असतो. त्यामुळे संपूर्ण आश्रमशाळा डासांपासून मुक्त करण्यासाठी आवश्यक उपयोजना करणे,लहान मुलांना शाळेमध्ये मलेरियाची कारणे, लक्षणे आणि उपचाराची गरज याविषयी माहिती देणे, मलेरिया रोगावरील जनजागृतीसाठी खास पेसा ग्रामसभा घेणे या विषयीही कार्यागट बैठकीत सविस्तर चर्चा झाली.२०१९ चा ॲक्शन प्लान तयार करून तत्काळ आणि आगामी काळात करावयाच्या उपाययोजना यावेळी ठरविण्यात आल्या.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-02-09


Related Photos