शेतकऱ्याला चिरडणारा वाहन चालक अखेर पोलिसांना गवसला


- तणावपूर्ण वातावरणात पोलिसांनी केली दहा तासात अटक
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / विरूर (स्टे.) :
राजुरा तालुक्यातील विरूर स्टे. जवळील सिर्सी गावाजवळ काल ८  फेब्रुवारी रोजी झालेल्या दुर्दैवी अपघातात एका  शेतकऱ्याचा मृत्यू झाला. एका अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत हिरामण धानोरकर (५५) हे जागीची ठार झाले होते. अपघातानंतर वाहनचालक वाहनासह पसार झाला होता. या वाहनचालकास पोलिसांनी दहा तासात अटक केली आहे. भास्कर बापु ठुसे (२२) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
अपघाताच्या घटनेनंतर संतप्त नागरीकांनी आरोपीला त्वरीत अटक करण्याच्या मागणीसाठी तसेच आर्थिक मदत देण्याच्या मागणीसाठी चक्काजाम आंदोलन केले होते. यावेळी घटनास्थळी प्रचंड तणाव होता. घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी देशमुख, विरूर स्टे. पोलिस ठाण्याचे ठाणेदार कतलाम, तहसीलदार होळी यांनी घटनास्थळी धाव घेवून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. सहा तासानंतर माजी आमदार वामनराव चटप, व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना समजूत घातली होती. यानंतर घटनास्थळावरून मृतदेह उचलून राजुरा - विरूर स्टे. मार्ग सुरू करण्यात आला. या सर्व घडामोडीनंतर आरोपीला पकडण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले होते.
तणावग्रस्त परिस्थिती आटोक्यात येताच विरूर स्टे. चे ठाणेदार कतलाम यांनी तपासचक्रे फिरवून गोपनिय माहितीद्वारे तेलंगणा राज्यातील व्यंकटपूर (सिरपूर) येथील आरोपी भास्कर बापु ठुसे  याला अटक केली. अपघातास कारणीभूत एमएच ३४ एव्ही ०३५१ क्रमांकाचे पिक वाहन ताब्यात घेतले. तपासानंतर आरोपीने अपघाताची माहिती दिली.
सदर कारवाई अवघ्या दहा तासात केल्याने नागरीकांनी पोलिसांच्या कार्यप्रणालीबद्दल समाधान व्यक्त केले. ही कारवाई  उपविभागीय पोलिस अधिकारी शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार अरविंद कतलाम, सचिन पडवे, प्रशांत बावणे, भगवान मुंडे, सुरेंद्र काळे यांनी केली आहे.

   Print


News - Chandrapur | Posted : 2019-02-09


Related Photos